ब्रिस्बेन : ‘भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा प्रेरणादायी क्रिकेटपटू आहे. त्याचा खेळ प्रभावित करणारा असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मीदेखील त्याच्यासारखाच खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे,’ असे ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक-फलंदाज एलिसा हिली हिने म्हटले. भारताविरुद्ध २१ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या मालिकेसाठी हीली तयारी करीत आहे.
हिली आतापर्यंत केवळ चार कसोटी सामने खेळली असून, तिने कसोटी सामन्यांतही एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे खेळण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हिली म्हणाली, ‘आधुनिक कसोटी सामन्यांमधील खेळ खूप बदलला आहे. मी यासाठी रोहित शर्मासारख्या खेळाडूंकडून प्रेरित होत आहे. रोहित सफेद चेंडूच्या क्रिकेटमधील सर्वांत खतरनाक फलंदाजांपैकी एक आहे. तरीही तो कसोटी क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी सलामीवीरांपैकी एक आहे.’
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रभावी खेळ केल्यानंतर रोहितने कसोटी क्रिकेटमध्येही आपली क्षमता सिद्ध केली. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये छाप पाडली. हिली याविषयी म्हणाली, ‘रोहित आपल्या कौशल्याच्या जोरावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शानदार फलंदाजी करतो आणि त्यासाठीच मलाही त्याच्याप्रमाणेच खेळायचे आहे.’
भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी हिली म्हणाली, ‘भारतीय संघ अत्यंत धोकादायक आहे. कारण त्यांच्या संघाविषयी कोणतीही भविष्यवाणी करता येणार नाही. आम्हालाही त्यांच्याविषयी काही गोष्टी माहीत नाहीत.’