पाकिस्तान विरुद्ध भारत यांच्यातील ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धांमध्ये आजवर १२ लढती झाल्या असून यात भारताचाच विजय झाला होता. पण यंदा ट्वेन्टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आणि पाकिस्तान संघानं इतिहास घडवला. बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकच्या संघानं भारतावर १० विकेट्सनं विजय प्राप्त केला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये जोरदार सेलिब्रेशन झालं. पण यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस यानं केलेल्या एका वादग्रस्त विधानानं पाणी फेरलं गेलं. वकार युनूस यांनी भारत-पाक सामन्याला धर्माशी जोडलं आणि त्यांच्या विधानामुळे जोरदार टीका होऊ लागली. अखेर टीकेचे धनी झालेल्या वकार युनूस यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.
वकार युनूस यांनी मोहम्मद रिझवान संदर्भात एक विधान केलं होतं. भारतीय संघाविरुद्ध विजय प्राप्त केल्यानंतर रिझवान यानं मैदानातच नमाद अदा केली होती. रिझवानच्या या कृतीचं वकार युनूस यांनी कौतुक केलं होतं. "रिझवाननं विजय प्राप्त केल्यानंतर भर मैदानात नमाज अदा केली हे माझ्यासाठी त्याच्या खेळीपेक्षाही जास्त महत्त्वाचं ठरलं. विशेषत: सर्व हिंदूंमध्ये उभं राहून त्यानं नमाज अदा केली", असं विधान युनूस यांनी केलं होतं. त्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. आता त्यावर युनूस यांनी माफी मागितली आहे.
"विजयाच्या उत्साहात त्यावेळी मी असं एक विधान केलं की ज्याला मी मानत नाही. यामुळे अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आणि मी यासाठी सर्वांची माफी मागतो. माझा चुकीचा उद्देश नव्हता. माझ्याकडून चूक झाली. जात, धर्म खेळ मानत नाही आणि सर्वांना जोडून ठेवायच काम करतं", असं ट्विट वकार युनूस यानं केलं आहे.