Join us  

Shane Warne: वॉर्न माझ्या आयुष्याचा एक भाग होता : क्लार्क; पॉटिंगला अश्रू अनावर

वॉर्नची आठवण निघताच पाँटिंगला अश्रू अनावर झाले. एका मुलाखतीदरम्यान पाँटिंगला रडताना पाहून अनेक जण गहिवरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 5:32 AM

Open in App

 मेलबोर्न : ‘शेन वॉर्नसारखा चांगला मित्र आता या जगात नाही, हे मी अजूनही स्वीकारू शकत नाही. कठीणसमयी खंबीरपणे पाठीशी असणारा सच्चा मित्र गमावल्याची खंत नेहमीसाठी राहील,’ असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने म्हटले आहे. क्लार्क आणि वॉर्न यांच्यात मैदानात आणि मैदानाबाहेर घनिष्ठ मैत्री होती.

  शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  ही बातमी येताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. ही बातमी क्लार्कला समजताच त्यालाही धक्का बसला. आपला पूर्वीचा जोडीदार आणि प्रत्येक कठीण प्रसंगात ढाल बनलेला वॉर्न माझी ताकद होता, असे सांगून क्लार्कने आपल्या स्तंभात पुढे लिहिले, ‘क्रिकेट हा नेहमी आकड्यांचा खेळ आहे. वॉर्नसोबतच्या माझ्या संबंधांचादेखील एक आकडा आहे तो म्हणजे २३... ! वन डे क्रिकेटमध्ये वॉर्नचे २३ नंबरचे टी शर्ट मी घालावे, असा वॉर्नचाच आग्रह होता.  हा सन्मान आयुष्यभर सोबत असेल. स्वत:चे टी शर्ट देऊन त्याने सिद्ध केले की मी नेहमीसाठीच तुझ्यासोबत असेन.’ 

‘पहिल्या दिवसापासूनच वॉर्न माझ्यासोबत इतका काही खुलला की मलादेखील काहीच कळले नाही. तो उदारमतवादी आणि प्रेमळ होता. तो जगलाही तसाच.  माझ्या दु:खात आणि कठीणसमयी तो सोबत राहिला. याच कारणास्तव वॉर्नच्या जाण्यावर विश्वास बसत नाही. या दु:खातून सावरणे कठीण होत आहे.’

याआधी २०१४ ला क्लार्कने आणखी एक जवळचा मित्र फिल ह्यूज याला गमावले.  ह्यूजचा स्थानिक सामन्यात डोक्यावर चेंडू आदळून मृत्यू झाला होता. क्लार्कने ह्यूजच्या पार्थिवाला खांदा दिला होता. त्याच्या श्रद्धांजली सभेतही भावनिक भाषण केले होते.

पॉटिंगला अश्रू अनावरवॉर्नची आठवण निघताच पाँटिंगला अश्रू अनावर झाले. एका मुलाखतीदरम्यान पाँटिंगला रडताना पाहून अनेक जण गहिवरले. तो म्हणाला, ‘शेनच्या जाण्याने किती मोठा धक्का बसला आहे, हे शब्दात सांगणे अवघड आहे. मी १५ वर्षांचा होतो तेव्हा अकादमीत त्याच्याशी माझी पहिली भेट झाली. वॉर्नने मला माझे टोपणनाव दिले. दशकाभरापेक्षा अधिक काळ आम्ही संघसहकारी होतो. अनेक चढ-उतार सोबत पाहिले. वॉर्न माझ्यासाठी असा कोणीतरी होता ज्यावर मी नेहमी विश्वास ठेवू शकत होतो. गरज असेल तेव्हा तो मदतीला हजर असायचा. विशेष म्हणजे तो मित्रांना खूप प्राधान्य द्यायचा. तो सर्वोत्तम फिरकीपटू होता.’ 

टॅग्स :शेन वॉर्न
Open in App