मुंबई-
आयपीएलचा मेगा लिलाव नुकताच पार पडला आणि यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींनी बोली लागली. यात अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंना नवे संघ मिळाले. पण काही परदेशी खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. यात दिल्ली कॅपिटल्सचा डेविड वॉर्नर, केकेआरमधील पॅट कमिन्स आणि पंजाब किंग्ज संघातील कगिसो रबाडा यांचा समावेश आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया आणि द.आफ्रिकेचे खेळाडू १० दिवस ते दोन आठवड्यांपर्यंत आयपीएल सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्स, डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसारखे मोठे खेळाडू ५ एप्रिलपर्यंत पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहेत. तर द.आफ्रिकेचा कगिसो रबाडा, एन्रिक नॉर्टजे आणि मार्को यानस्नन देखील ११ एप्रिलपर्यंत बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत सहभागी होणार आहे. आयपीएलची सुरुवात २७ मार्चपासून होण्याची शक्यता आहे आणि मे च्या अखेरपर्यंत स्पर्धा रंगेल.
ऑस्ट्रेलियाचे चेअरमन आणि निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा संघ ठरलेल्या दौऱ्यांनुसार मालिका खेळत असल्यास त्यावेळात आयपीएलसाठी खेळाडूंना रिलीज केलं जाणार नाही. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा ५ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
द.आफ्रिकेची बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका
द.आफ्रिकेचे खेळाडू बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतरच आयपीएलसाठी उपलब्ध होतील असा इशाराच द.आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं याआधीच दिला आहे. आयपीएल लिलावात जर द.आफ्रिकेच्या एखाद्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली तरी त्याचं प्राधान्य राष्ट्रीय सामन्यांकडे राहिल. त्याला आयपीएल बाजूला ठेवून देशासाठी खेळावच लागेल, असं द.आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर यानं म्हटलं आहे.
Web Title: warner rabada cummins among prominent players likely to miss first chunk of ipl 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.