Join us  

वॉर्नरच्या आयपीएल सहभागाबाबतचा निर्णय काही दिवसांतच - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

वॉर्नरच्या आयपीएलबाबतचा निर्णय काही दिवसांतच घेणार आहोत, असे सुतोवाच सनराइजर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 8:34 PM

Open in App
ठळक मुद्देचूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे. पण आयसीसीने वॉर्नरवर मात्र काही कारवाई केलेली नाही.

नवी दिल्ली : चेंडूशी छेडछाड केल्यामुळे ऑस्‍ट्रेलियाचा संघ टीकेचा धनी ठरत आहे. ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर त्यांच्या क्रिकेट मंडळाने कारवाई केली आहे. त्याचबरोबर आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदीही घातली आहे. आता त्याच्यावर आजीवन बंदी घालावी की नाही, यावर चर्चा सुरु आहे. पण वॉर्नरच्या आयपीएलबाबतचा निर्णय काही दिवसांतच घेणार आहोत, असे सुतोवाच सनराइजर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने केले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर ही आमची रणनिती होती, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने जाहीरही केले. चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे. पण आयसीसीने वॉर्नरवर मात्र काही कारवाई केलेली नाही.

" वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय काय निर्णय घेते, हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. या प्रकरणी आम्हाला कोणतीही घाई करायची नाही. त्यामुळे या दोन्ही संघटनांनी आपला निर्णय घेतल्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू, " असे लक्ष्मण म्हणाला.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथचेंडूशी छेडछाड