अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात लखनौ सुपरजायंटस्ने मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी थरारक पराभव केला. यासह लखनौने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले असून, मुंबईची चौथ्या स्थानी घसरण झाली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लखनौने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. यानंतर त्यांनी मुंबईला २० षटकांत ५ बाद १७२ धावांवर रोखले.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात लखनौच्या विजयासह लखनौचा कर्णधार कृणाल पांड्याची देखील चर्चा रंगली आहे. स्टॉयनिस व कृणाल या जोडीने चौथ्या विकेटसाठी ५९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली. १४व्या षटकानंतर कृणाल रिटायर्ट हर्ट झाला... त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. पांड्याने ४२ चेंडूंत ४९ धावा केल्या आणि माघारी परतला. मात्र कृणाल पांड्या दुखापतीचं खोटं कारण सांगून माघारी परतल्याची टीका सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे. मात्र आता स्वत: कृणाल पांड्याने याचं कारण सांगितलं आहे.
सामना संपल्यानंतर कृणाल पांड्याला रिटायर्ट हर्टचे कारण विचारण्यात आले. यावर माझ्या पायाला क्रॅम्प आला होता. मला माझे स्नायू ताणले गेल्याचे जाणवले. त्यामुळे मी मैदानाबाहेर गेलो, असं कृणाल पांड्याने सांगितले. मी नेहमीच संघाचा खेळाडू आहे, संघासाठी काहीही करण्यास तयार आहे. निकालाने खूप आनंदी आहे. मोहसीनने गेल्या वर्षभरात एकही सामना खेळला नाही. पण शस्त्रक्रियेनंतर तो इतका चांगला खेळ करू शकतो हे चांगले आहे, असं कृणाल पांड्याने सांगितले.
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ५८ चेंडूंत १० धावांची वेगवान सलामी दिली. मात्र, यानंतर मुंबईचा डाव घसरला. ५५ धावांत ५ बळी गमावल्याने मुंबईची बिनबाद ९० धावांवरून ५ बाद १४५ धावा, अशी घसरण झाली. टिम डेव्हिडने अखेरपर्यंत नाबाद राहत मुंबईच्या विजयासाठी शर्थ केली; परंतु सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, विष्णू विनोद आणि कॅमरुन ग्रीन यांचे अपयश मुंबईला महागात पडले. यश ठाकूर आणि रवी बोश्नोई यांनी मोक्याच्या वेळी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला जबर धक्के दिले. मुंबईला अखेरच्या षटकात ११ धावांची गरज असताना वेगवान गोलंदाज मोहसीन खानने केवळ ५ धावा देत निर्णायक मारा केला.