नवी दिल्ली : प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्यात दिलीप वेंगसरकर यांचा हातखंडा आहे.यादृष्टीने ते सर्वांत उत्कृष्ट निवडकर्ते ठरले आहेत. राष्ट्रीय संघाचा कर्णधार विराट कोहलीतील कमालीची क्षमता त्यांनी बालवयातच ओळखली होती.
वेंगसरकर यांनी निवड समिती अध्यक्ष म्हणून २००६ ते २००८ या काळात काम केले. याच काळात महेंद्रसिंग धोनी कर्णधार बनला तर विराटला संधी मिळू शकली. सोमवारी ६४ वा वाढदिवस साजरा करणारे वेंगसरकर यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना गुणवत्ता शोध हे माझे काम होते असे सांगून उत्कृष्ट प्रतिभावान खेळाडूला संधी मिळायलाच हवी, हे आपले सूत्र होते असे सांगितले.
‘मी निवड समिती प्रमुख म्हणून यशस्वी ठरू शकलो कारण त्यावेळी बीसीसीआयच्या गुणवत्ता शोध विकास विभागाशी जुळलो होतो. धोनीेसारखा खेळाडू याच शोध मोहिमेतून गवसला. सध्या गुणवत्ता शोध विकास विभाग अस्तित्वात नाही.,’ असेही वेंगसरकर म्हणाले.
विराट १५ वर्षे क्रिकेट खेळू शकेल असे वाटले होते का, या प्रश्नाच्या उत्तरात वेंगसरकर म्हणाले, ‘कुठल्याही खेळाडूची कारकीर्द इतकी लांबलचक चालेल याची खात्री नसते. मी विराटमधील कमालीची प्रतिभा ओळखली. गुणवत्तेची ओळख असेल तर तो खेळाडू किती यशस्वी होईल, याचा देखील वेध घेता येतो. अव्वल दर्जाचे क्रिकेट खेळण्यासाठी अवांतर कौशल्य लागते. ते विराटकडे होते.’
विराटची निवड होऊ नये यासाठी काही दडपपण होते का, यावर वेंगसरकर म्हणाले,‘ माझ्यावर कुणीही दडपण आणले नाही. विराट प्रतिभावान खेळाडू असल्याने त्याला पाठिंब्याची गरज होती.
गुणवत्ता शोध मोहिमेत १९ वर्षांच्या खेळाडूंना सहभागी करुन घेण्याची अट असताना मी महेंद्रसिंग धोनीला वयाच्या २१ व्या वर्षी निवडले. यामागे देखील वेगळा विचार होता. बंगालचे माजी कर्णधार प्रकाश पोद्दार यांच्या शिफारसीवरुन धोनीची निवड झाली. पोद्दार १९ वर्षांखालील सामन्यासाठी जमशेदपूरला गेले होते. शेजारच्या स्टेडियममध्ये बिहारचा संघ एकदिवसीय सामना खेळत होता. चेंडू वारंवार बाहेर जात असल्याने पोद्दार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. चेंडू इतका दूर कोण फटकावतो याचा शोध घेतला, तेव्हा महेंद्रसिंग धोनीचा शोध लागला. गुणवत्ता शोध मोहिम माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सुरू केली. परंतु, बीसीसीआयमध्ये ते पराभूत होताच ही मोहिम बंद झाली.’
वेंगसरकर यांनी राष्टÑीय क्रिकेट समितीच्या सध्यस्थितीेवर निराशा व्यक्त केली. तेथे प्रतिभावान खेळाडू घडविण्यापेक्षा रिहॅबिलिटेशन केंद्र तयार केले जात आहे, या शब्दात ताशेरे ओढले. (वृत्तसंस्था)
‘कोहलीचा निर्धार आवडला होता’
कोहलीचा विषय निघताच वेंगसरकर अभिमानाने सांगतात,‘ आॅस्ट्रेलियाच्या इमर्जिंग संघाच्या दौऱ्यात कोहली सलामीला खेळण्यास तयार होता. कोहलीचा हा निर्धार मला फारच आवडला होता. ज्युनियर क्रिकेटमध्ये मी विराटला अनेकदा पाहिले. निवड समिती प्रमुख बनताच त्याला इमर्जिंग संघात निवडले. फलंदाजी करताना पाहून मनोमन खात्री पटली की हा खेळाडू मोठी जबाबदारी सांभाळू शकतो.’
Web Title: was seen in Virat great potential
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.