- ललित झांबरे
वॉशिंग्टन सुंदर, नेपोलियन आईनस्टाईन, सचिन बेबी...अलीकडे भारतीय क्रिकेटमध्ये अशी काही जगावेगळी नावे ऐकायला मिळत आहेत? अशी कशी नावे आहेत ही? काय आहे त्यांच्यामागची कहाणी? यावर तुमचा विश्वास बसेल का की ज्युलियस सिझर आणि विल्यम शेक्सपियर नावाचेसुध्दा क्रिकेटपटू होऊन गेलेत?
वॉशिंग्टन सुंदरटी-20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरलेला वॉशिंग्टन सुंदर मुळचा तामिळनाडूचा. पण मग त्याचा अमेरिका आणि वॉशिंग्टनशी काही संबंध आहे का? तर तसा काहीच संबंध नाही. वॉशिंग्टन वडील एम. सुंदर हे क्रिकेटवेडे परंतु त्यांची घरची परिस्थिती जेमतेमच. मात्र चेन्नईच्या मरिना ग्राउंडवर खेळताना त्यांना पी.डी. वॉशिंग्टन नावाचे निवृत्त लष्करी अधिकारी नेहमी पहायचे. त्यांनी एम. सुंदर यांना जवळपास दत्तकच घेतले. त्यांच्यासाठी शाळेचा गणवेश, फी, पुस्तके यांची व्यवस्था तेच करायचे. एवढेच नाही तर एम. सुंदरला मैदानावर सायकलीने तेच सोडायचे. प्रोत्साहन तर होतेच. त्यामुळे एम. सुंदर हे संभाव्य रणजी संघापर्यंत पोहचले. पुढे सुंदर यांना मुलगा झाला आणि हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पित्याने बाळाचे नाव त्याच्या कानात कुजबुजायचे असते. त्यावेळी एम. सुंदर यांनी पी.डी. वॉशिंग्टन यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून बाळाच्या कानात नाव कुजबुजले..'वॉशिंग्टन'. कारण वॉशिंग्टन हे त्यांच्यासाठी देवापेक्षा कमी नव्हते आणि अशा प्रकारे एम. सुंदर यांचा मुलगा बनला ' वॉशिंग्टन सुंदर' जो आज भारताच्या टी-20 संघातील सर्वात तरुण खेळाडू आहे.
नेपोलियन आईन्स्टाईननेपोलियन आईनस्टाईन...हे आणखी एक जगावेगळं नांव. या नावाचा हा क्रिकेटपटू सध्या भारताच्या 19 वर्षाआतील संघात आहे. हा सुध्दा तामिळनाडूचाच. त्याचा तसा नेपोलियन व आईनस्टाईन या दोघांशी काहीही संबंध नाही पण मग त्याचे हे नाव कसे आले? त्याची कहाणी हा क्रिकेटपटू अशी सांगतो की.. त्याचे आजोबा शास्त्रज्ञ. त्यांनी एकदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांना पत्र लिहिले आणि त्याला आईनस्टाईन यांनी उत्तरसुध्दा दिले होते. त्याची आईसुध्दा भौतिकशास्त्रात पदवीधर आणि शाळेत विज्ञान शिक्षिका. असा विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेला असल्याने त्यांनी ह्याचे नाव ठेवाले 'आईनस्टाईन'. आणि त्याच्या वडिलांचे नाव 'नेपोलियन'. म्हणून हे आगळेवेगळे नाव. याबद्दल अधिक माहिती देताना आईनस्टाईन सांगतो की आम्ही लोकं बुध्दिवादी. आमचा देव आणि दैवावर,विश्वास नाही म्हणून इतर लोकः जसे देवदेवतांच्या नावावर आपल्या मुलांची नावे ठेवतात तसे माझ्या आईवडिलांनी महान व्यक्तींच्या नावावर माझे नाव ठेवले.
सचिन बेबीसचिन बेबी...केरळच्या या क्रिकेटपटूच्या नावाचीही कहाणी काहीशी अशीच...नेम्ड आफ्टर ग्रेट पर्सन! सचिनचे वडील पी. सी. बेबी हे अक्षरशः क्रिकेटवेडे. 11 डिसेंबर 1988 रोजी अवघ्या 15 वर्षे वयात सचिन तेंडूलकरने प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणातच शतक झळकावले आणि त्यानंतर आठवडाभरातच बेबींकडे बाळ आले आणि पी. सी. नी निश्चितच केले की या बाळाचे नाव सचिनच ठेवणार. अशाप्रकारे आले सचिन बेबी हे नांव.
जुलीयस सिझरआता अशाच आश्चर्यचकित करणाऱ्या नावांची चर्चा चाललीय म्हणून...जुलीयस सिझर आणि विल्यम शेक्सपिअर हीसुद्धा क्रिकेटपटूंची नावे आहेत. विश्वास बसो वा ना बसो, पण क्रिकेट इतिहासात या नावाच्या खेळाडूंची नोंद आहे. जुलियस सिझर...सरे काउंटीचा हा क्रिकेटपटू. 1849 ते 1867 दरम्यान थोडथोडके नव्हे तर तब्बल 194 प्रथम श्रेणी सामने त्यांच्या नावावर आहेत. 1859 म ध्ये परदेशी गेलेल्या पहिल्या इंग्लिश संघाचेही ते सदस्य होते आणि 1863-64 मध्ये अॉस्ट्रेलियात गेलेल्या संघातही ते होते. गरिबीमुळे या खेळाडूचे आयुष्य अवघ्या 47 वर्षांचेच राहिले आणि 1878 मध्ये त्यांचे निधन झाले. विल्यम शेक्सपियर विल्यम शेक्सपियर...या नावाला खरं तर कोणत्याच ओळखीची गरज नाही परंतु क्रिकेटपटू राहिलेल्या विल्यम शेक्सपियरची मात्र ओळख देण्याची निश्चितच गरज आहे. 1919 ते 1931 दरम्यान वॉर्सेस्टरशायर काउंटीसाठी 26 सामने या शेक्सपियरने खेळले. त्यानंतर 1974 ते 76 दरम्यान ते या काउंटी क्लबचे अध्यक्ष होते.आशिश विन्स्टन झैदी आता हे नाव पहा ,'आशिश विन्स्टन झैदी'. साहजिकच उत्तर प्रदेशचा हा गोलंदाज मित्रांमध्ये 'अमर, अकबर, अँथनी' या टोपणनावाने ओळखला जायचा त्यात नवल नाही. कारण त्याचे नावचं सर्वधर्मसमभावाचे प्रतिक आहे. आता या मागची कहाणी अशी की आशिशचे आजोबा होते मुस्लीम आणि आजी होती ख्रिश्चन. त्यानंतर बारशावेळी कुटुंबियांनी त्यात भर घातली हिंदू नावाची, आशिश. अशाप्रकारे आशिश विन्स्टन झैदी. या नावाबद्दल नेहमी विचारणा होत गेल्यावर एका मुलाखतीत आशिश म्हणाला होता की आता माझ्या नावात 'सिंग' सुध्दा जोडून घेण्याची सूचना काही जणांनी केली आहे. निक्सन मक्लियन आता विंडिज क्रिकेटपटू निक्सन मॅक्लियनचं पूर्ण नाव पहा. ते आहे निक्सन अॅलेक्सी मॅक्लिअन. या नावाचे वैशिष्टय हे की यात अमेरिका व रशियादरम्यानच्या शीतयुध्दाच्या काळातील प्रमुख राष्ट्रप्रमुखांची नावे आहेत. जसे की रिचर्ड (निक्सन- अमेरिका), अॅलेक्सी (कोसजीन- सोव्हिएट रशिया), रॉबर्ट मॅकन्मारा (तत्कालीन अमेरिकी परराष्ट्र मंत्री) . विशेष उलेलखनीय बाब ही की निक्सन मॅक्लियनच्या आईवडिलांनी त्याच्या भावंडांचीसुध्दा नावे अशी वेगवेगळ्या नेत्यांच्या नावावर ठेवली होती. तर..अशी ही क्रिकेटपटूंच्या अजब नावाची गजब दुनिया मोठी मनोरंजक आहे.