चितगाव : राशीदने दुसऱ्या डावात ६ व सामन्यात घेतलेल्या एकूण ११ बळींच्या जोरावर अफगाणिस्तानने पावसाचा व्यत्यय व अंधूक प्रकाशादरम्यान एकमेव कसोटी सामन्यात सोमवारी बांगलादेशचा २२४ धावांनी धुव्वा उडवला.
अफगाणिस्तानच्या तिसºयाच कसोटीत राशीदने ११ आणि कारकीर्दीत प्रथमच कसोटीत १० किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतल्या. त्याने अखेरच्या दिवशी बांगलादेशच्या चारपैकी ३ फलंदाजां बाद केले. त्या जोरावर अफगाणिस्तानने ३९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाºया बांगलादेशला ६१.४ षटकांत १७३ धावांत गुंडाळले. निर्णायक कामगिरी करणारा राशीद सामनावीर ठरला.
पावसामुळे सकाळच्या सत्रात खेळ झाला नाही. स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता खेळ सुरु झाला; परंतु २.१ षटकांनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले. अखेरच्या सत्रात ४ वाजून २० मिनिटांनी खेळ सुरू झाल्यानंतर बांगलादेशला सामना वाचवण्यासाठी १८.३ षटके खेळायचे आव्हान होते; परंतु अफगाणिस्तानने तीन षटके बाकी असताना विजय मिळवला. बांगलादेशने सोमवारी ६ बाद १३६ धावांनी सुरुवात केली. झहीर खानने अखेरच्या सत्रातील पहिल्या चेंडूवर कर्णधार शाकीब अल हसनला (४४) बाद केले. त्यानंतर राशीदने मेहदी हसन (१२) व ताइजुल इस्लाम (०) यांना पायचीत करतानाच सौम्य सरकारलाही बाद केले.