नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup 2022) सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेतील बहुचर्चित भारत-पाकिस्तानचा (IND vs PAK) सलामीचा सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमने टी-20 विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी केली आहे. अक्रमने केलेल्या दाव्यानुसार, भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे 3 संघ विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठू शकतात. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. मात्र विश्वचषकापूर्वीच संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला होता.
जाहीर केले 3 सेमीफायनलिस्ट खलीज टाईम्सशी संवाद साधताना अक्रमने म्हटले, "भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे 3 संघ मजबूत असून ते उपांत्यफेरीत पोहचू शकतात. या 3 संघामधील दोन संघ अंतिम फेरी गाठू शकतात." तसेच यावेळच्या टी-20 विश्वचषकात वेगवान गोलंदाजांची कामगिरी पाहण्यासारखी असेल. ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते, त्यामुळे जो गोलंदाज योग्य लाईन आणि योग्य वेगाने गोलंदाजी करेल त्याला नक्कीच यश मिळेल, असे अक्रमने अधिक म्हटले.
अक्रमने भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे कौतुक करताना म्हटले, 'भुवी नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो पण त्याच्याकडे वेग नाही. जर चेंडू स्विंग झाला नाही तर भुवीला तिथे खूप त्रास सहन करावा लागू शकतो. पण तो एक महान गोलंदाज आहे आणि मला खात्री आहे की तो चांगली गोलंदाजी करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल. पण ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे."
बुमराहच्या जागी उमरान मलिकला खेळवायला हवं - अक्रम खरं तर वसीम अक्रमने विश्वचषकाची उपांत्यफेरी गाठणाऱ्या चौथ्या संघाबाबत कोणतीच भविष्यवाणी केली नाही. त्याने केवळ भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे 3 संघ उपांत्यफेरीत पोहचू शकतात असे म्हटले. "बुमराहची अनुपस्थिती म्हणजे भारतीय संघाला मोठा धक्का आहे. मला बुमराहच्या जागी उमरान मलिकला पाहायचे होते. जर मी भारतीय व्यवस्थापनाच्या समितीमध्ये असतो तर मी त्याला कोणत्याही परिस्थितीत संघात घेतले असते", असेही अक्रमने म्हटले. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआय लवकरच बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा करेल.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना