islamabad vs lahore match: पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामात लाहोर कलंदर्सचा संघ संघर्ष करत आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोरने मागील दोन हंगामात जेतेपद पटकावले. मात्र, बुधवारी लाहोरच्या संघाने इस्लामाबाद युनायटेडचा पराभव केला. या सामन्यात २४ वर्षीय अब्दुला शफीकने इमाद वसीमचा झेल घेतल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले. याचाच दाखला देत पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमने संताप व्यक्त केला. रावळपिंडी येथे झालेल्या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या.
इस्लामाबाद युनायटेडच्या डावातील सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर इमाद बाद झाला. स्लीपमध्ये उभा असलेल्या अब्दुला शफीकने अप्रतिम झेल घेतला. झेल घेताच त्याने जोरदार सेलिब्रेशन केले आणि प्रेक्षकांना शांत बसण्याचा इशारा केला. डेव्हिड वाइजच्या गोलंदाजीवर इस्लामाबाद युनायटेडला आणखी एक झटका बसला.
शफीकने जोरदार सेलिब्रेशन केल्यानंतर वसीम अक्रमने त्याच्यावर सडकून टीका केली. तो म्हणाला की, जो खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ३६ झेल सोडतो, त्याचे उत्तर कोण देणार? शफीकने अप्रतिम झेल घेतला याबद्दल शंका नाही. पण असे सेलिब्रेशन करायची काय गरज होती. त्याला सांगा की, क्रिकेट सोडून नाटकात काम कर... ऑस्ट्रेलियात ३६ झेल सोडले त्याचे उत्तर दे मग टीकाकारांना शांत करण्याचा प्रयत्न कर. अक्रम पाकिस्तान सुपर लीगचे विश्लेषण करताना 'स्पोर्ट्स ए'वर बोलत होता.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तेव्हा अब्दुला शफीकने स्लीपच्या इथे क्षेत्ररक्षण करताना अनेकदा सोपे झेल सोडले होते. पाकिस्तानला ती मालिका ३-० अशा फरकाने गमवावी लागली होती. कांगारूंच्या धरतीवर सतत झेल सोडल्यामुळे अब्दुला टीकाकारांच्या निशाण्यावर आला.