मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये इफ्तिखार अहमद आणि जेसन रॉय यांच्यात वाद झाला. अनेक नाट्यमय घडामोडींमुळे ही लीग चर्चेत असते. आता पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार अहमद आणि इंग्लंडच्या जेसन रॉय यांच्यात बाचाबाची झाली. लाईव्ह सामन्यात जोरदार राडा झाल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी क्रिकेटर इफ्तिखार अहमद आणि इंग्लिश खेळाडू जेसन रॉय यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. रॉयने केलेले हातवारे पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमला खटकले अन् त्याने संताप व्यक्त केला.
नेमकं झालं काय?
पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामातील २९ व्या सामन्यात मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यातील दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकात क्वेटाचा फलंदाज जेसन रॉयला डेव्हिड विलीने LBW केले. यानंतर रॉय दुसऱ्या टोकाला असलेल्या त्याच्या संघातील सहकारी खेळाडूसोबत रिव्ह्यू घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेला. अशातच इफ्तिखार काही बोलला, जे ऐकून इंग्लिश क्रिकेटर संतापला आणि पाकिस्तानी क्रिकेटरकडे गेला आणि वाद घालू लागला. वाद वाढत असल्याचे दिसताच मुल्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने हे प्रकरण शांत केले. या घटनेमुळे रॉयने रिव्ह्यू टाईमचा १५ सेकंदांचा वेळ गमावला आणि अवघ्या ३ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
वादाचा दाखला देत अक्रम म्हणाला की, जेसन रॉय पाकिस्तानात आहे हे त्यानं ध्यानात ठेवावं. त्याने पाकिस्तानची संस्कृती आणि येथील खेळाडूंचा आदर करायला हवा. त्याला बाद घोषित केल्यावर त्यानं रागवायचं काय कारण होतं? एक चूक झाली होती आणि त्यानं उगीचच संताप व्यक्त केला. तो अशा प्रकारचं नेहमी उल्लंघन करत असतो. अक्रम पाकिस्तानातील 'ए स्पोर्ट्स'वर पाकिस्तान सुपर लीगचे विश्लेषण करताना बोलत होता.
तसेच पाकिस्तानातील खराब स्टेडियमवरून अक्रमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला लक्ष्य केले. त्याने सांगितले की, आपण भारतातील धर्मशाला आणि दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्सटाऊन यांसारखी मैदानं केवळ स्वप्नातच पाहू शकतो. आपल्या देशात अबोटाबाद आहे, ते सुंदर आहे पण विकसित नाही. आम्ही गद्दाफी स्टेडियमचे छत नीट राखू शकत नाही आणि आमच्याकडे असलेल्या तीन स्टेडियमचेही दुरावस्था करून ठेवली आहे.
Web Title: Wasim Akram expresses his anger over the controversy between Iftikhar Ahmed and Jason Roy in Pakistan Super League 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.