Wasim Akram On Shaheen Afridi | नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आणि ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीला विश्रांती देण्यात आली. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्या दोन सामन्यात सर्वाधिक षटके टाकल्यामुळे आफ्रिदीला शेवटच्या सामन्यातून विश्रांती दिली गेली. यावरून क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली अन् काहींनी पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी कान टोचले. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने मात्र वेगळाच धडा सांगत आफ्रिदीला सुनावले.
पाकिस्तानी संघ आगामी काळात न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे, ज्याचे नेतृत्व शाहीन शाह आफ्रिदीकडे आहे. पण, कसोटी सामन्यातून आफ्रिदीला विश्रांती दिल्याने अक्रमने संताप व्यक्त केला. 'फॉक्स क्रिकेट'वर बोलताना अक्रमने म्हटले, "याचा संघ व्यवस्थापनाशी काहीच संबंध नाही. हा निर्णय खेळाडूला घ्यावा लागतो, त्याला महान खेळाडू बनायचे आहे की कोट्यवधी रूपये कमवायचे आहेत. आराम करण्याचा निर्णय फक्त आणि फक्त शाहीन आफ्रिदीचा होता. कसोटी मालिकेनंतर लगेचच त्याच्या नेतृत्वात संघाला न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळायची आहे. पण, ट्वेंटी-२० क्रिकेटची काळजी कोणाला आहे? मी तर म्हणतो ट्वेंटी-२० क्रिकेट म्हणजे केवळ मनोरंजन आहे, तिथे पैसा आहे. पण खेळाडूंनी लक्षात घ्यायला हवे की कसोटी क्रिकेट अल्टीमेट क्रिकेट आहे. जर तुम्ही लोकांना विचारले की, २० वर्षांपूर्वी सिडनी क्रिकेटमध्ये काय झाले होते, तर हे लोकांना माहिती असेल पण काल परवा सिडनी येथे झालेल्या ट्वेंटी-२० सामन्याबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही." एकूणच खेळाडूंनी ट्वेंटी-२० क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायला हवे असे अक्रमने म्हटले.
सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. हा अखेरचा सामना म्हणजे पाकिस्तानसाठी अस्तित्वाची लढाईच... खरं तर मागील २८ वर्षांत एकदाही शेजाऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे हा लाजिरवाणा विक्रम मोडण्याचे आव्हान शान मसूदच्या नेतृत्वातील संघावर आहे. या मालिकेनंतर पाकिस्तान न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार असून यासाठी संघाची घोषणा झाली आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तान न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शाहीन आफ्रिदी (कर्णधार), आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, आझम खान, अबरार अहमद, बाबर आझम, फखर झमान, हारिस रौफ, हसिबुल्लाह खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसिम, सहिबझादा फर्हान, सैय अयुब, उसामा मीर, झमान खान.