आयपीएलच्या धर्तीवर खेळवली जाणारी पाकिस्तान सुपर लीग अंतिम टप्प्यात आली आहे. मुल्तान सुल्तान आणि इल्माबाद युनायटेड हे संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. 'करा किंवा मरा' अर्थात नॉक आउट सामने सुरू असताना देखील पाकिस्तानी चाहत्यांनी सामन्यांकडे पाठ फिरवली. पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम विविध कारणांनी फ्लॉप ठरला असल्याचा दावा पाकिस्तानचे माजी खेळाडू करत आहेत. स्टेडियममधील दुरावस्था, प्रेक्षकांची होणारी गैरसोय आणि परदेशी खेळाडूंनी केलेला कानाडोळा यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फटका बसला.
इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी लढत झाली. कराचीतील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. पाकिस्तानातील काही नामांकित मंडळींनी या सामन्यासाठी हजेरी लावली. पण, नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली.
PCB ला घरचा आहेर
पाकिस्तान सुपर लीगकडे प्रेक्षकांनी कानाडोळा केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अशातच पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमने हे लाजिरवाणे असल्याचे सांगितले. आपली निराशा व्यक्त करताना वसीम अक्रम म्हणाला की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काहीच पावले टाकत नाही. आता याबद्दल काय बोलण्यात अर्थ देखील नाही. अनेकदा अनेकांनी या मुद्द्यांवरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती तशीच आहे. प्लेऑफ सामन्यांमध्येही प्रेक्षक येत नाहीत, ही लाजिरवाणी बाब आहे. अक्रम 'ए स्पोर्ट्स'वर पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यांचे विश्लेषण करत असताना बोलत होता.
दरम्यान, लाहोर, रावळपिंडी आणि मुल्तान सारख्या ठिकाणी प्रेक्षकांची बऱ्यापैकी संख्या होती. पण कराचीतील मैदानात प्रेक्षकांचा दुष्काळ दिसला. रमजानच्या आगमनामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान सुपर लीग आयपीएलनंतर जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग असल्याचा दावा शेजारील देशातील आजी माजी खेळाडू करतात.
Web Title: Wasim Akram has criticized the Pakistan Cricket Board (PCB) for not having the audience to watch the Pakistan Super League matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.