Wasim Akram, India vs Pakistan: भारतीय संघाला मायदेशात लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. पहिल्या दोन सामन्यांनंतर वानखेडेवरील तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ २५ धावांनी पराभूत झाला. शेवटच्या डावात भारताला केवळ १४७ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभ पंत वगळता अन्य सर्व फलंदाज पूर्णपणे अयशस्वी ठरले. भारतीय संघाला भारतीय भूमीवर पहिल्यांदाच ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रविंद्र जाडेजा, रवी अश्विन यांसारखे बडे खेळाडू अयशस्वी ठरले. या लाजिरवाण्या पराभवावर विविध स्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. याचदरम्यान पाकिस्तान माजी कर्णधार वासिम अक्रम याने भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
"आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी खेळली जायला हवी. मला खात्री आहे की दोन क्रिकेटवेड्या देशामध्ये खेळला जाणारा सामना नक्कीच सुपरहिट ठरेल. मला तर असंही वाटतंय की आता पाकिस्तानचा संघ भारताला फिरकीसाठी पोषक खेळपट्टीवर नक्कीच हरवेल. तशी संधी त्यांना नक्कीच आहे. कारण नुकतेच भारतीय संघाला न्यूझीलंडने ३-० ने पराभूत केले आहे," असे वासिम अक्रम म्हणाला. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यात कॉमेंट्री करत असताना त्याने हे विधान केले.
तिसऱ्या कसोटीत काय घडलं?
भारताने वानखेडेवर तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात २३५ वर ऑलआऊट केले. त्यानंतर भारताचा पहिला डाव २६३ वर संपला आणि भारताला थोडी आघाडी मिळाली. तिसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ १७४ वर बाद झाला. भारताला १४७ धावांचे आव्हान होते. पण रिषभ पंतच्या अर्धशतकाशिवाय इतर कुणीही फलंदाजी चांगली फलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव १२१ धावांत आटोपला आणि न्यूझीलंडने २५ धावांनी सामना जिंकला.