Wasim Akram On KKR: आयपीएल म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत अन् लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग. या लीगमध्ये जगभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असतो. २००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा पाकिस्तानातील देखील खेळाडू या स्पर्धेचा भाग होते. पण, कालांतराने पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. मात्र, आता पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमने मी अद्याप कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. अक्रम केकेआरच्या संघाचा माजी गोलंदाजी प्रशिक्षक आहे. (IPL 2024 News) अक्रम म्हणाला की, यंदाच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ चांगली कामगिरी करत आहे. केकेआर हा एक चांगला संघ आहे. मी केकेआरसाठी काम केले आहे, त्यामुळे साहजिकच मी या संघाचे समर्थन करतो. मी एखाद्या सरड्याप्रमाणे भूमिका बदलत नाही अर्थात संघ बदलत नाही. अक्रम 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलत होता.
अक्रमचे रोखठोक मतकेकेआर आताच्या घडीला १० गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील संघाने सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यांनी शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका धावेने पराभव केला. वसीम अक्रमने केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरचेही कौतुक केले. गंभीरची रणनीती आणि डावपेच संघासाठी फायदेशीर आहेत, असे अक्रमने सांगितले.
गंभीरचे कौतुक करताना अक्रम म्हणाला की, नक्कीच गौतम गंभीरचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्याने केकेआरच्या संघाला एका नव्या पटरीवर नेले आहे. गंभीर फ्रँचायझीपासून दूर गेल्यानंतर केकेआरच्या संघाची सामान्य कामगिरी राहिली होती.