पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याच्यावर गंभीर आरोपांच्या फेऱ्या सुरूच आहेत. सोमवारी पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाजच्या आरोपांनंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार आमिर सोहेलनं दिग्गज गोलंदाजावर गंभीर आरोप केले आहेत. एका स्थानिक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सोहेलनं गंभीर आरोप केले.
1992नंतर पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकू न देणे, याची काळजी अक्रमनं घेतली, असा आरोप सोहेलनं केला. सोहेल म्हणाला,''1996च्या वर्ल्ड कप पूर्वी एक वर्ष म्हणजेच 1995मध्ये रमीझ राजा संघाचे कर्णधार होते. त्यापूर्वी सलीम मलिक यांनी ही जबाबदारी पार पाडली. हे यशस्वी ठरले होते आणि त्यांना एक वर्ष अजून संधी दिली असती, तर अक्रमला वर्ल्ड कप मध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसती.''
''वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी संघाचा कर्णधार बदलून ती जबाबदारी अक्रमकडे सोपवण्याचा घाटच घातला गेला होता. 1992नंतर पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकू नये, याची काळजी अक्रमने घेतली. त्यासाठी इम्रान खानने त्याला प्रेसीडेंट पुरस्कारही दिला,'' असा आरोप सोहेलनं केला.
''अक्रम पाकिस्तान संघासोबत प्रामाणिक राहिला असता तर 1996, 1999 आणि 203चा वर्ल्ड कप हा संघानं जिंकला असता. या नाटकामागे काहीतरी कारण नक्की आहे आणि त्याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणामागील दोषींना सर्वांसमोर आणले पाहीजे,'' असेही सोहेल म्हणाला. सोहेलनं पाकिस्तानकडून 47 कसोटी, 156 वन डे सामने खेळले आहेत आणि अनुक्रमे 2833 व 4780 धावा केल्या आहेत.
'1999च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासह पाकिस्तानच्या दोन मॅच फिक्स'; वसीम अक्रमवर गंभीर आरोपपाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाजनं दावा केला की, 1999च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे दोन सामने फिक्स केले गेले होते. या सामन्यातील फायनल आणि बांगलादेशविरुद्धचा सामना फिक्स केला होता, असा दावा करताना सर्फराजनं तत्कालीन कर्णधार अक्रमवर निशाणा साधला आहे.
सर्फराज नवाजनं पाकिस्तानच्या एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा गंभीर आरोप केला. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ मुद्दाम बांगलादेशकडून हरली होती. त्यात पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा सर्फराजने केला. तो म्हणाला,''सामन्यापूर्वी मी स्टेडियममध्ये जाऊन कर्णधार वसीम अक्रमशी चर्चा केली. वसीमनं सांगितले की कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायला हवा कारण हा सामना फिक्स असल्याची अफवा पसरली आहे. वसीम म्हणालेला हा सामना आपण जिंकू, परंतु प्रत्यक्षात पाकिस्तान सामना हरला.''