भारतीय संघा आयसीसीची ट्रॉफी उंचावण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. २०२१ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाच्या जवळ जाऊनही टीम इंडियाला यश मिळालं नाही. आता २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप भारतात होतोय आणि यजमानांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने शेवटचा वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर २०१५ व २०१९ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे.
टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत
घरच्या मैदानावर खेळण्याचा नक्कीच भारतीय संघाला फायदा होईल, परंतु त्याचवेळी पाकिस्तानचा माजी महान गोलंदाज वसीम अक्रम याने रोहित अँड कंपनीला आरसा दाखवला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना होणार आहे आणि सर्व जण त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अक्रमच्या मते भारतीय संघाची गोलंदाजांची फळी ही मजबूत बाजू आहे, परंतु त्याचवेळी पाकिस्तानही कुठे कमी नाही.
''भारताकडे मोहम्मद शमी आहे आणि त्याने प्रभावी कामगिरी केली आहे, परंतु जसप्रीत बुमराहला संपूर्ण स्पर्धेत तंदुरुस्त रहावे लागेल. त्याच्या तंदुरुस्तीबाबत मला अद्याप पूर्णपणे माहिती नाही, परंतु त्याचे असणे खूप फरक पाडणारे असेल. त्याशिवाय भारताकडे रवींद्र जडेजा, आर अश्विन हे चांगले अष्टपैलू फिरकीपटू आहेत. पाहूयात यापैकी कोण खेळतं ते. आणखी काही चांगले खेळाडू भारतीय संघात येत आहेत. २०११ मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता, परंतु यजमान म्हणून तुमच्यावर नेहमीच अधिकचे दडपण असते. तसे यावेळीही असेल,''असे अक्रम म्हणाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीवरून बरीच चर्चा झाली. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाकिस्तानचे सामने ४ शहरांमध्ये होणार आहेत, तर भारताला ९ वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागणआर आहे. सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमदाबाद येथे भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. शिवाय त्यांनी अन्य काही सामन्यांच्या ठिकाणांवर आक्षेप घेतला होता. पण, अक्रमच्या मते ठिकाण ही काही चिंतेची बाब असू शकत नाही. तो म्हणाला, मी याआधीही म्हटले आहे. मला एखाद्या ठिकाणी आणि एखाद्या तारखेला खेळायला सांगितले, तर मला ते खेळणए भाग आहे. मग ते अहमदाबाद किंवा चेन्नई किंवा कोलकाता किंवा मुंबई असो.. त्याने खेळाडूंना काही फरक पडत नाही. त्यामुळे खेळा आणि त्याचा जास्त विचार करू नका.