नागपूर : देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याने स्वत:च्या नावे अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च रणजी चषक स्पर्धेत ११ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज बनला.
बुधवारी जाफरने विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत १५३ धावा ठोकल्या. त्याआधी ११ हजार धावांसाठी त्याला ९७ धावा हव्या होत्या. यासह जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५४वे शतकही झळकावले.
मुंबईकडून रणजी स्पर्धेत पदार्पण करणारा हा शैलीदार फलंदाज अनेक सामने खेळला. कसोटी संघातून देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर वसीमने काही वर्षांपासून विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
बडोद्याविरुद्ध खेळताना जाफरने विदर्भाचा कर्णधार फैज फझलसोबत (१५१ धावा) ३०० धावांची भागीदारीही केली. विशेष म्हणजे, रणजी करंडकात ३०० हून अधिक धावांच्या भागीदारीची जफरची ही चौथी वेळ आहे.
वसीम जाफर याने यासह विजय हजारे यांच्या विक्रमाची देखील बरोबरी केली. रणजी चषक स्पर्धेत वसीम जाफर याच्यापाठोपाठ सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याचाच माजी सहकारी अमोल मुझुमदार याच्या नावावर आहे. मुझुमदार याने ९,२०२ आणि मध्य प्रदेशचा फलंदाज देवेंद्र बुंदेला याने ९२०१ धावा फटकावल्या आहेत. जाफरच्या नावावर रणजी चषक स्पर्धेत सर्वाधिक ३७ शतके आणि ८१ अर्धशतक झळकावण्याच्या पराक्रमाचीही नोंद आहे.
Web Title: Wasim became the first batsman to hit 11,000 runs in the Ranji Trophy tournament
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.