T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या ६ खेळाडूंना डच्चू देत यंदा तगडे खेळाडू मैदानावर उतरवण्यात येणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी प्रयोग करण्याची भारतीय संघाला ही शेवटची संधी आहे. त्यामुळे एक मजबूत ११ खेळाडूंचा संघ उभा करण्याचे आव्हान कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर आहे. त्यात त्यांना अनेक सल्लेही मिळत आहेत. भारताचा माजी कसोटीपटू वासीम जाफर ( Wasim Jaffer) यानेही एक सल्ला दिला आहे.
जाफरने कर्णधार रोहित शर्माला एक सल्ला दिला आहे आणि त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा दाखला दिला आहे. रोहितने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी अशी विनंती जाफरने केली. रिषभ पंतला ओपनिंगला प्रमोशन देऊन पंत-लोकेश राहुल या जोडीकडून वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या डावाची सुरूवात करावी असे मत जाफरने व्यक्त केले. २४ वर्षीय रिषभ हा भविष्याचा स्टार आहे आणि त्याला ओपनिंगची संधी दिल्यास, त्याचा खेळ अधिक उंचावले, असे जाफरला वाटते. यावेळी जाफरने २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील किस्सा सांगितला. त्यावेळी कर्णधार धोनीने रोहितला ओपनिंगची संधी दिली होती आणि शिखर धवनसह त्याने दमदार कामगिरी करताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती.
जाफरने ट्विट केले की, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये रिषभ पंतला ओपनिंगची संधी द्यायला हवं असं मला वाटतं. रोहितने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं. महेंद्रसिंग धोनीनं २०१३मध्ये रोहितला ओपनिंगला पाठवून केलेला प्रयोग सर्वांना पाहिला आणि त्यानंतरचा रिझल्ट इतिहास घडवतोय... त्यामुळे ऱिषभ, लोकेश राहुल, विराट कोहली, रोहित व सूर्यकुमार यादव असा फलंदाजीचा क्रम असायला हवा.