शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि त्या संघाला माजी कर्णधार राहुल द्रविड मार्गदर्शन करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री अन् टीम आहे. त्यामुळेच श्रीलंका दौऱ्यावर भारताचा दुसरा संघ पाठवण्यात आला आहे आणि त्याच्या प्रशिक्षकपदी द्रविड आहे. रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार आहे आणि त्यांच्यानंतर ही जबाबदारी राहुल द्रविडनं स्वीकारावी अशी अनेकांची इच्छा आहे. पण, भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर ( Wasim Jaffer) याचं म्हणणं काही वेगळंच आहे. राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहू नये. त्यानं युवा खेळाडूंना घडवण्याचं काम करत रहावं. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे आणि टीम इंडियासाठी मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करण्याचं कम त्यानं करत रहावं, असे मत जाफरनं व्यक्त केलं.
जाफरनं त्याच्या यू ट्यूब चॅनेलवर हे मत व्यक्त केले. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका दौऱ्यावर खेळणाऱ्या युवा खेळाडूंना त्याच्या अनुभवाचा खूप फायदा मिळणार आहे, असेही तो म्हणाला. भारताचे दोन संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत आणि यावरून हे स्पष्ट होते की भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे. भारताकडे एकापेक्षा एक सरस खेळाडूंची फौज तयार आहे, असेही जाफर म्हणाला.
त्याने सांगितले की,''द्रविडला अजूनही १९ वर्षांखालील आणि भारत अ संघाच्या खेळाडूंसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करायला हवं. भारताच्या सीनियर संघाकडून खेळणारे खेळाडू परिपक्व आहेत. त्यामुळे आपल्याला नवीन खेळाडू तयार करण्यावर भर द्यायला हवं. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली हे काम यशस्वीरित्या होऊ शकते. त्यानं युवा खेळाडूंना घडवण्याचं काम करतच राहायला हवं. त्यामुळे भविष्यात आपल्याकडे अजून चांगले खेळाडू तयार होतील.''