Wasim Jaffer Tweet, ENG vs NZ Test: IPLचा हंगाम संपल्यानंतर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर पहिल्या कसोटीला कालपासून सुरूवात झाली. सामन्यातील दोन्ही संघांचे पहिले डाव गडगडले. न्यूझीलंडला पहिल्या डावात १३२ धावाच करता आल्या तर इंग्लंडला १४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टी दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांनी योग्य वापर केला. पण या दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याने केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय चुकला. उपाहारापर्यंत त्यांनी ३९ धावांत ६ गडी गमावले. त्यानंतर त्यांचा डाव १३२ धावांवर आटोपला. पदापर्णात मॅटी पॉट्सने ४ तर अनुभवी जेम्स अँडरसननेही ४ बळी टिपले. त्यानंतर इंग्लंडची अवस्थाही काहीशी तशीच झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची अवस्था ७ बाद ११६ झाली. टीम साऊदी, कायल जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट तिघांनी २-२ बळी टिपले. पहिल्या दिवशी तब्बल १७ गडी बाद झाल्यावर सोशल मीडियावर दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे गोडवे गायले जात असल्याचे दिसले. त्यावेळीच वासिम जाफरने खोचक ट्वीट करत साऱ्यांना गप्प केले. इंग्लंडमध्ये १७ गडी एका दिवसात बाद झाले तर ते गोलंदाजांचे यश आणि अहमदाबादच्या मैदानात तसंच घडलं तर भारतीय खेळपट्ट्या वाईट', असं त्याने कॅप्शन लिहिलं. तसेच, 'हम करे तो कॅरेक्टर ढिला', या ओळीसह फोटो पोस्ट केला आणि टीकाकारांना उत्तर दिलं.
दरम्यान, गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज दिवंगत शेन वॉर्नचे स्मरण करण्यात आले. न्यूझीलंडच्या डावात २३ षटकांनंतर सामना २३ सेकंदांसाठी थांबवण्यात आला आणि शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यात आली. शेन वॉर्नच्या जर्सीचा क्रमांक २३ असल्यामुळे त्याला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. २३वे षटक संपल्यानंतर मैदानावरील स्क्रीनवर शेन वॉर्नचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या दरम्यान, चाहते, खेळाडू आणि अंपायर्स यांनी उभे राहून शेन वॉर्नच्या समृद्ध योगदानासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्याली अनोखी आदरांजली अर्पण केली.