T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या सराव सामने खेळवले जात आहेत. स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांकडे पाहिले जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना खेळवला जाईल. विश्वचषकात टीम इंडियाचा फलंदाजी क्रम कसा असेल याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून कोण दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने वेगळी भूमिका मांडत विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांना सलामीवीर म्हणून संधी द्यायला हवी असे म्हटले आहे.
भारत विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात आयर्लंडविरूद्धच्या सामन्याने करेल. ५ जून रोजी हा सामना खेळवला जाईल. तर ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. वसीम जाफरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून म्हटले की, ट्वेंटी-२० विश्वचषकात विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामीवीर म्हणून खेळावे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी खेळायला हवे. फिरकीपटूंचा चांगल्या पद्धतीने सामना करण्याची क्षमता रोहितमध्ये आहे. त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर खेळल्यास काही अडचण येईल असे मला वाटत नाही. पण, जाफरच्या या मतावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त करताना कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित पॉवरप्लेमध्ये असायलाच हवा असे अनेकांनी म्हटले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ -
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
Web Title: Wasim Jaffer wants Yashasvi Jaiswal and Virat Kohli to open and Rohit Sharma to play at number four in T20 World Cup 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.