पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्याकडून झालेल्या मानहानिकारक पराभवाचा टीम इंडियाला एवढा मोठा धक्का बसला की त्यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून अखेरच्या साखळी सामन्यापूर्वीच बाद व्हावे लागले. जेतेपदाचे प्रबळ दावेदार असा जो स्पर्धेपूर्वी फुगा केला होता, त्याची हवा पहिल्याच सामन्यात निघाली. हार्दिक पांड्याची फिटनेस हा या संपूर्ण स्पर्धेत भारतीय चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय होता. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात एकही चेंडू न टाकणाऱ्या हार्दिकला निवड समितीनं वर्ल्ड कपसाठीच्या संघात अष्टपैलू म्हणून सहभागी करून घेतले. पण, त्यानं दोनच सामन्यात गोलंदाजी केली. आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर हार्दिकनं ( Hardik Pandya) ट्विट करून भारतीय चाहत्यांना वचन दिले.
भारताचा 'अष्टपैलू' खेळाडू हार्दिक पांड्यानं चाहत्यांनी दाखवलेला विश्वास व पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी दुप्पट मेहनत घेणार असल्याचे ट्विट केलं. भारतानं Super 12 मधील अखेरच्या साखळी सामन्यात नामिबियावर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा व मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा हा अखेरचा सामना होता. हार्दिकनं या स्पर्धेत पाच सामन्यांत ५८ धावा केल्या आणि ४० धावा देत एकही विकेट घेतली नाही.
काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियानं धक्के बसूनही २० षटकं खेळून काढताना ८ बाद १३२ धावा केल्या. आर अश्विन ( ३-२०) व रवींद्र जडेजा ( ३-१६ ) यांनी दमदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराहनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ५६) आणि लोकेश राहुल ( ५४*) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. टीम इंडियानं १५.२ षटकांत १ बाद १३६ धावा केल्या.
हार्दिकनं ट्विट केलं की...
''वर्ल्ड कप स्पर्धेतील असा शेवट व्हावा ही आमची इच्छा नव्हती. आम्हाला अपेक्षित निकाल लागला नाही. आम्ही कुठेतरी कमी पडलो, परंतु चाहत्यांनी दाखवलेल्या विश्वासाची व पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत घेऊ. आमच्यासाठी चिअर करणाऱ्या प्रत्येकाचे आभार,''असे पांड्यानं ट्विट केलं.