भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी भारतीय खेळाडूंच्या सततच्या दुखापतींवर टीका केली आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासाठी जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) पुनरागमनाकडे लक्ष लागले आहेत. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हेही दुखापतीतून सावरताना दिसत आहेत. बुमराहने दोन सत्रांत १० षटकं टाकण्यास सुरूवात केली असल्याची माहिती समोर येत आहे आणि जय शाह यांनीही तो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तंदुरुस्त होणल असे अपडेट्स दिले आहेत. पण, कपिल देव यांच्या मते जसप्रीत बुमराहवर आपण वेळ वाया घालवतोय.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या मालिकेत जसप्रीतच्या पाठीच्या दुखण्यानं पुन्हा डोकं वर काढलं अन् त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर जसप्रीतच्या पुनरागमनाची बीसीसीआयने घाई केली आणि त्यामुळे त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपलाही मुकावे लागले. त्यामुळे बीसीसीआयवर जोरदार टीका झाली. त्यामुळे बीसीसीआय वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर कोणतीच घाई करू इच्छित नाही. पण, कपिल देव यांच्या मते वर्ल्ड कप स्पर्धा महत्त्वाची आहे आणि त्यांनी भारतीय खेळाडूंची दुखापत ज्या प्रकारे हाताळली जातेय, यावर नाराजी व्यक्त केली आहे.
''बुमराहसोबत काय झालं होतं? त्याने खेळण्यास सुरूवात केली होती आणि आपल्याला विश्वास दाखवला, परंतु तो जर वर्ल्ड कप खेळणार नसेल, तर आपण त्याच्यामागे वेळ वाया घालवतोय. रिषभ पंत किती चांगला खेळाडू आहे. तो जर असता तर आपलं कसोटी क्रिकेट आणखी चांगलं झालं असतं,''असे कपिल देव म्हणाले. आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंच्या दुखापती वाढल्याचा दावाही कपिल देव यांनी केला. खेळाडू सध्या भारताकडून खेळण्याचं टाळतात, परंतु आयपीएलमधील सर्व सामने खेळतात, असेही ते म्हणाले.