India Women vs England Women, Only Test - भारतीय महिला संघ बऱ्याच वर्षांनी कसोटी क्रिकेट खेळायला मैदानावर उतरला आहे. इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशी चारशेपार धावांचा डोंगर उभा केला आहे. शुभा सथिश, जेमिमा रॉड्रीग्ज, यास्तिका भाटिया व दीप्ती शर्मा यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी आजचा दिवस गाजवला. पण, ४९ धावांवर बाद झालेली कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटची रंगलीय चर्चा... हरमनप्रीतचे कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक अवघ्या १ धावांनी विचित्र पद्धतीने बाद झाल्याने हुकले..
डी वाय पाटीलवर सुरू असलेल्या या कसोटीत स्मृती मानधना ( १७) व शफाली वर्मा ( १९) यांना मोठी खेळी करता आली नाही. लॉरेन बेल व केट क्रॉस यांनी त्यांना बाद केले. पदार्पणवीर शुभा व जेमिमा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. शुभाने ७६ चेंडूंत ६९ धावा केल्या, तर जेमिमाने ९९ चेंडूंत ६८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभी होती. पण, फिफ्टी पूर्ण करण्यासाठीची धाव पूर्ण करताना तिची बॅट अडकली अन् रन आऊट होऊन ती माघारी परतली.