Join us  

Hasan Ali Video: Pakistanच्या हसन अलीने क्रिकेटला लाज आणली! शिवीगाळ करत थेट प्रेक्षकांमध्ये घुसला अन्...

अचानक असा विचित्र प्रकार घडल्याने सामना थांबला, गर्दी जमली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 11:47 AM

Open in App

Pakistan Hasan Ali Video: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय संघातून बाहेरच आहे. काही काळापूर्वीपर्यंत संघाचा मुख्य गोलंदाज असलेला हसन अली फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळे तो संघाचा भाग नाही. एकीकडे पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे (PAK vs ENG). या दरम्यान, हसन अलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ एका स्थानिक सामन्यातील असून त्यात त्याने चक्क रागाच्या भराच सर्व सीमा पार केलेल्या दिसत आहे. क्रिकेट हा 'जेंटलमन्स गेम' म्हणजे सभ्यतेचा खेळ मानला जातो, पण हसन अलीच्या या कृतीने खेळालाच गालबोट लागल्याची भावना क्रिकेट प्रेमी व्यक्त करत आहेत.

संतापल्यावर थेट प्रेक्षकाच्या अंगावर धावून गेला...

पाकिस्तानी मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, हसन अली रविवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पाकपट्टन जिल्ह्यातील आरिफवाला शहरात स्थानिक सामना खेळत होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हसनला पाकिस्तान संघातून वगळण्यात आल्याने लोक त्याले ट्रोल करत होते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने झेल सोडला आणि सामन्याचा निकालच बदलला. त्यावरूनही त्याची खिल्ली उडवली जात होती. हा प्रकार सातत्याने घडल्यानंतर हसन अली संतापला. त्याचा संयम सुटला आणि तो चक्क प्रेक्षकाच्या अंगावर धावून गेला आणि मारहाण करू लागला. त्यानंतर बाकीच्या लोकांनी त्याला बाहेर काढले. त्यामुळे सामना थांबला आणि मोठी गर्दीही जमली होती. पाहा व्हिडीओ-

२०१७ मध्ये हसन अलीने पाकिस्तान जिंकवून दिली होती 'चॅम्पियन्स ट्रॉफी'

२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. स्पर्धेत १३ विकेट घेणाऱ्या हसन अलीला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षांत त्याची कामगिरी खालावली. एकेकाळचा जगातील नंबर वन वन डे गोलंदाज हसन अलीने सप्टेंबरमध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला. त्याला जुलैनंतर कसोटी आणि जूननंतर वन डे खेळण्याची संधी मिळालेली नाही. आशिया कप २०२२ मध्ये तो संघाचा भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

 

 

 

टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तानसोशल व्हायरलसोशल मीडिया
Open in App