सिडनी : महिला बिग बॅश लीगमध्ये बुधवारी ग्रेस हॅरीसने विक्रमी खेळी केली. हॅरीसने बिग बॅश लीगमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा पराक्रम केला. ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅरीसने अवघ्या 42 चेंडूंत शतक पूर्ण केले. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे दुसरे जलद शतक ठरले. वेस्ट इंडिजच्या डिंड्रा डॉटीनने 2010 च्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत 38 चेंडूंत शतक झळकावले होते. एकिकडे हॅरीसची फटकेबाजीचा उदोउदो होत असताना पुरुषांच्या बिग बॅश लीगमध्ये घडलेल्या विचित्र प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बिग बॅश लीगमध्ये बुधवारी ब्रिस्बन हिट आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याला टॉस उडवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी टॉससाठी कोणतेही नाणे वापरण्यात आले नव्हते तर चक्क बॅट उडवून टॉस करण्यात आला. या "bat flip" टॉसमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने बाजी मारली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.