India vs England, T20: इंग्लंड विरुद्धचा पहिला टी-२० सामना भारतीय संघानं गमावला. भारताची फलंदाजी अतिशय निराशाजनक राहिली. यात सलामीवीर केएल राहुल देखील स्वस्तात बाद झाला. पण त्यानं क्षेत्ररक्षणात कमाल केली. केएल राहुलनं केलेल्या एका जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी काही खास राहिली नाही. भारताला २० षटकांत केवळ १२४ धावा करता आल्या. यात केएल राहुलनं केवळ १ धाव केली. प्रत्युत्तरात इंग्लंडनं भारतीय संघानं दिलेलं कमकुवत लक्ष्य सहजपणे गाठलं. पण केएल राहुलनं केलेल्या एका जबरदस्त क्षेत्ररक्षणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सामन्याच्या पाचव्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर जोस बटलर यानं लाँग ऑनच्या दिशेनं षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला. पण तिथं क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असलेल्या केएल राहुलनं हवेत झेप घेऊन चेंडू अडवला आणि सीमा रेषेच्या आत फेकला. अशापद्धतीनं केएल राहुलनं आपल्या संघासाठी ५ धावा वाचवल्या. केएल राहुलचं क्षेत्ररक्षण पाहून इंग्लंडचे खेळाडू आवाक झाले आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनंही केएल राहुलचं कौतुक केलं.