दक्षिण आफ्रिकेचे माजी पंतप्रधान नेल्सन मंडेला यांच्या १०३व्या जयंती निमित्तानं भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. आजचा दिवस हा नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस किंवा मंडेला दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्णभेदाविरुद्ध लढा देण्यात मंडेला यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. सचिननं एक बॅट दाखवून या व्हिडीओची सुरूवात केली आहे आणि त्यावर मंडेला यांची स्वाक्षरी दिसत आहे.
सचिननं व्हिडीओत म्हटलं की,'' ही स्वाक्षरी कोणाची आहे हे ओळखता येतंय का?; ग्रेट माणसाला भेटण्याचं भाग्य मला मिळालं. १९९२-९३साली मी नेल्सन मंडेला यांना भेटलो. भारतीय संघ प्रथमच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा संघही बऱ्याच कालावधीनंतर पहिली मालिका खेळत होता. जोहान्सबर्ग येथील तो सामना पाहण्यासाठी मंडेला आले होते. ''
''१९९६-९७साली मंडेला यांना पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. केप टाऊनमध्ये दुसरी भेट झाली होती आणि योगायोग असा की त्यांच्यासोबतच्या दोन्ही भेटीदरम्यान मी शतकी खेळी केली होती. त्यामुळे जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितले की तुम्ही माझ्यासाठी लकी आहात म्हणून.. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक सामन्याचे आमंत्रण देतो आणि आम्ही दोघंही हसलो,''असे सचिननं या व्हिडीओत सांगितले.
मंडेला यांचे खेळाविषयाच्या मताबाबत सचिननं सांगितले की,''ते नेहमी खेळाला प्रोत्साहन द्यायचे. त्यांचे प्रोत्साहन हे आमच्यासाठी खूप काही होतं आणि खेळ लोकांना एकत्र आणतो, असा त्यांचा विश्वास होता. त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना आणि त्यांचे मत हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत आणि आजही त्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं.''