भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजयाचा टीम इंडियाचा निर्धार आहे. त्याचवेळी बांगलादेशनेही ऐतिहासिक मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही संघ नागपूर सामन्यात संपूर्ण ताकदीनं उतरतील हे निश्चित. या सामन्यासाठी भारतीय संघ राजकोटवरून नागपूरसाठी रवाना झाला आहे. त्या प्रवासात खेळाडूंनी मज्जामस्ती केली. त्यात शिखर धवनमधील कलाकार पाहायला मिळाला.
गोलंदाजी हा भारतासाठी चिंतेची बाब आहे. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळालीय, परंतु त्यांना त्यावर खरे उतरता आलेले नाही. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. पण, जलद माऱ्यात टीम इंडियाला मार खावा लागला आहे. दीपक चहरच सातत्यपूर्ण खेळ करताना पाहायला मिळत आहे. त्याला खलिल अहमदकडून साजेशी साथ मिळालेली नाही. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेकडे तितकासा अनुभव नाही. त्यामुळे खलिल आणि शिवम यांच्या जागी अनुक्रमे शार्दूल ठाकूर व मनीष पांडे यांना संधी मिळू शकते. पण, रोहित आहे तोच संघ तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे.