आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज गोलंदाज होऊन गेले, सध्या आहेत आणि भविष्यात अजून होतीलही. प्रत्येकानं आपापल्या वेगळ्या शैलीनं क्रिकेटविश्व गाजवलं. पण, आज आपण अशा एका गोलंदाजाला भेटणार आहोत, की ज्याची शैली पाहून सर्वांनाच धक्का बसेल. या गोलंदाजाला डाव्या हातानं चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणावं की उजव्या हातानं... हाच खरा प्रश्न आहे. हो हे खरं आहे. क्रिकेटविश्वात सध्या याच गोलंदाजाची चर्चा आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मॅझन्सी सुपर लीग ट्वेंटी-20 त केप टाऊन ब्लित्झ संघाचे प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज चक्क दोन्ही हातानं गोलंदाजी करतो. नुसते चेंडू टाकत नाही, तर विकेटही मिळवतो.
केप टाऊन ब्लित्झ संघाच्या ग्रेगरी माहलोक्वाना या फिरकीपटूनं दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या या अनोख्या शैलीनं हैराण केलं. डरबन हिट्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 3 षटकांत 26 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्यानं या दोन्ही विकेट डाव्या-उजव्या हातानं गोलंदाजी करून मिळवल्या. त्यानं डरबन हिट्सचा सलामीवीर सॅरेल एर्वीनं बाद केलं. यावेळी माहलोक्वानानं उजव्या हातानं गोलंदाजी केली.