BAN vs AFG T20I : अफगाणिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि त्यांनी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत यजमान बांगलादेशचा पराभव केला. आजपासून सुरू झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात थरारक अनुभव आला. १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला शेवटच्या ६ चेंडूत ६ धावा हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या करीम जनातने सलग तीन विकेट घेत हॅट्ट्रिक साधली. त्यामुळे बांगलादेशला दोन चेंडूत दोन धावा हव्या होत्या अन्...
बांगलादेशने सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि एका टप्प्यावर ५२ धावांपर्यंत चार विकेट पडल्या होत्या. मात्र पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या मोहम्मद नबीने ४० चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानने ७ बाद १५४ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
१५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही चांगली झाली नाही आणि ६४ धावांवर चार विकेट पडल्या होत्या. पण ५व्या क्रमांकावर खेळणाऱ्या तौहीद ह्रदोयने एक टोक सांभाळले. शमीम हुसेननेही त्याला साथ दिली. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाली. शमीमने २५ चेंडूत ४ चौकारांसह ३३ धावा केल्या. बांगलादेशला शेवटच्या षटकात ६ चेंडूत ६ धावांची गरज होती आणि त्यांच्या ५ विकेट पडल्या होत्या.
अफगाणिस्तानसाठी वेगवान गोलंदाज करीम जनात शेवटचे षटक टाकण्यासाठी आला. मेहदी हसन मिराजने ( ८ धावा) पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला, परंतु दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर करीमने तिसऱ्या चेंडूवर तस्किन अहमद आणि चौथ्या चेंडूवर नसूम अहमद यांना बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. तो अफगाणिस्तानसाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात रशीद खाननंतर हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. बांगलादेशला दोन चेंडूत दोन धावा हव्या होत्या आणि शॉरीफुल इस्लामने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून बांगलादेशला विजय मिळवून दिला. बांगलादेशने १९.५ षटकांत ८ विकेट गमावत १५७ धावा करून सामना जिंकला. करीमने १.५ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.