MS Dhoni Andre Russell Video Viral IPL 2024 CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज संघाने IPL 2024 मधील आपली विजयी घोडदौड पुन्हा सुरू केली. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळाल्यानंतर पुढील दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. पण CSKने पराभवाची हॅटट्रिक होणे रोखले. कोलकाता विरूद्धच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आणि पुन्हा विजयपथावर वाटचाल सुरू केली. आधी चेन्नईच्या गोलंदाजांनी आपली चुणूक दाखवत कोलकाताला १३७ धावांवर रोखले. त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी करत संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. या मैदानावर महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांबद्दल एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली.
IPL 2024 च्या पहिल्या ४ सामन्यांमध्ये चेन्नईने चेपॉक येथे दोन सामने खेळले. महेंद्रसिंग धोनी या दोन्ही सामन्यात फलंदाजीला आला नव्हता. महेंद्रसिंग धोनी आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला. चेन्नईला सामन्यात फक्त तीन धावांची गरज होती. त्यानंतर वैभव अरोराने शिवम दुबेला बोल्ड केले. यानंतर धोनी फलंदाजीला आला. धोनीची फलंदाजी पाहण्याच्या आशेने मैदानात आलेल्या चाहत्यांना बरे वाटले. धोनी फलंदाजीसाठी ड्रेसिंग रुममधून क्रिजवर चालत येत असताना संपूर्ण चेपॉक स्टेडियममध्ये ‘धोनी धोनी’चा जयघोष झाला. प्रेक्षकांच्या उत्साहाला सीमा नव्हती. आवाज इतका जास्त होता की, आंद्रे रसेलला चक्क कानावर हात ठेवावा लागला. तो सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. रसेलने कानावर हात ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
रवींद्र जाडेजाची फॅन्सशी 'बनवाबनवी'
CSK सामना जिंकणार इतक्यात शिवम दुबे बाद झाला. विजयासाठी फक्त ३ धावांची गरज होती. चेपॉकच्या फॅन्सना धोनीला खेळताना पाहायचे होते. त्यामुळे दुबेनंतर तरी धोनीने खेळायला यावे अशी साऱ्यांची अपेक्षा होती. पण रविंद्र जाडेजा मजा-मस्तीच्या मूडमध्ये दिसला. धोनी फलंदाजीला येणार या अपेक्षेने चाहते वाट पाहत असताना जाडेजा बॅटिंग किट घालून ड्रेसिंग रूममधून बाहेर आला, जणू काही तोच फलंदाजीसाठी जातोय. त्यामुळे प्रेक्षकांचा जल्लोष थोडा कमी झाला. पण नंतर थोडे पुढे जाऊन तो मागे फिरला आणि त्यानंतर मोठ्या जल्लोषात चेपॉकच्या मैदानावर धोनी मैदानात उतरला. जाडेजा ही धमाल पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आले नाही. धोनी मैदानात आल्यानंतर त्याने फटकेबाजी केली नाही. विजयासाठी तीन धावा शिल्लक असल्याने त्याने ऋतुराज गायकवाडला स्ट्राइक दिली आणि मग कर्णधार ऋतुराजने विजयी चौकार लगावला.
Web Title: watch video Andre Russell closed ears due to cheer when ms dhoni came to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.