Gujarat Titans Victory Parade IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद नावावर करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची ओपन बसमधून सोमवारी राजेशाही मिरवणूक काढण्यात आली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील प्रथमच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने ( GT) जेतेपद पटकावून विक्रमी कामगिरी केली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत गुजरातने हा करिष्मा करून दाखवला. हार्दिकचे हे पाचवे आयपीएल जेतेपद असले तरी कर्णधार म्हणून त्याने प्रथमच हा चषक उंचावला. त्यामुळेच या संघाच्या मिरवणूकीला रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.
२००८ साली राजस्थान रॉयल्सने पहिल्या पर्वात जेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर आपल्या पहिल्याच पर्वात जेतेपद पटकावणारा गुजरात हा पहिला संघ ठरला.
कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे हे पहिलेच जेतपद असले तरी त्याचे हे पाचवे आयपीएल जेतेपद आहे. या विजयासह सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरला. हा विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहे. रोहित, महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर यांच्यानंतर हार्दिक हा आयपीएल जेतेपद पटकावणारा चौथा कर्णधार आहे. त्याने २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली मुंबई इंडियन्सचा खेळाडू म्हणून जेतेपदाचा चषक उंचावला होता अन् २०२२मध्ये त्याने कर्णधार म्हणून ही कामगिरी केली. रोहितच्या नावावर ५ जेतेपदं आहेत, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू यांच्याही नावावर प्रत्येकी ५ जेतेपदं आहेत. महेंद्रसिंग धोनी व लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी ४ वेळा ही कामगिरी केली आहे.