Jasprit Bumrah gifts his Purple Cap to Young Boy: मुंबई इंडियन्सच्या संघाला मंगळवारी लखनौ सुपरजायंट्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. नेहल वढेराने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केल्याने मुंबईला कशीबशी १४०पार मजल मारता आली. १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. पण अखेर लखनौने ४ चेंडू राखून सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाची फलंदाजी अतिशय सुमार झाली. तुलनेने गोलंदाजीत मुंबईने चांगली कामगिरी केली. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला सामन्यात एकही विकेट घेता आली नाही पण त्याने २४ पैकी १६ चेंडू निर्धाव टाकले. तसेच चार षटकांच्या स्पेलमध्ये १७ धावा दिल्या. मुंबईचा संघ हरला असला तरी बुमराहच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली.
IPLचा सामना बघायला आलेले प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहून खुश होतात. आपल्या कॅमेऱ्यात त्याच्यासोबत लांबून का होईना पण सेल्फी काढून खुश होतात. पण कालच्या सामन्यात एका चिमुरड्याला आयुष्याभर लक्षात राहिल अशी छानशी आठवण मिळाली. सामना संपल्यानंतर प्रेक्षक घरी निघाले होते. स्टेडियममधील एका स्टँडजवळ मोजकेच प्रेक्षक थांबले होते. अशा वेळी जसप्रीत बुमराह ड्रेसिंग रूमकडे जात असताना त्याने एका छोट्या मुलाला पाहिले. तो मुलगा नेट्सच्या पलिकलच्या बाजुला उभा होता. पण बुमराहला त्याने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. त्या वेळी बुमराहने थेट आपली पर्पल कॅप त्याला देऊन टाकली. बुमराहने कॅप दिल्यानंतर त्या मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पाहा हा व्हिडीओ-
दरम्यान, मुंबईच्या संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांसारखे बडे खेळाडू स्वस्तात बाद झाले. पण नेहल वढेराने केलेल्या सर्वाधिक ४६ धावा आणि त्याला टीम डेव्हिड (नाबाद ३५) तर इशान किशनची (३२) मिळालेली साथ यांच्या जोरावर मुंबईने १४४ धावापर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने चांगली गोलंदाजी केली. पण मार्कस स्टॉयनीस (६२)च्या झुंजार खेळीच्या जोरावर लखनौला सामना जिंकला.