नवी दिल्ली : क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे एखादा क्रिकेटपटू जर असभ्य वागला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येते. पण जर संघटनेमधील सदस्यांनी असभ्य वर्तन केले तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार, असा सवाल आता विचारला जात आहे. कारण क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या हाणामारीचा व्हिडीओ चचांगलाच वायरल झाला आहे.
रविवारी सर्व सदस्यांसाठी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने वार्षिक साधारण सभा बोलावली होती. या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. पण काही वेळाने एक वेळ अशी आली की या पदाधिकाऱ्यांमध्ये थेट हाणामारी व्हायला सुरुवात झाली.
अरुण जेटली स्टेडियम फिरोजशाह कोटला स्टेडियम येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा तोल सुटला आणि त्यांनी थेट हाणामारी करायला सुरुवात केली. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. आता या सदस्यांवर बीसीसीआय काय कारवाई करते, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेले आहे.