Join us  

८ चौकार, ९ षटकार! २५ वर्षीय शतकवीर RCBचा आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवणार

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नेहमीच स्टार खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूला ( RCB) एकही जेतेपद पटकावता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:50 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नेहमीच स्टार खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूला ( RCB) एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. पण, यावेळी विराट कोहलीच्या संघाने आयपीएल लिलावात काहीतरी विचार करून युवा खेळाडूंना ताफ्यात घेतले. त्यातल्याच एका २५ वर्षीय खेळाडूसाठी त्यांनी ३.२ कोटी रुपये मोजले आणि ते का, याचे उत्तर काल मिळाले. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये ( SA20) विल जॅक्सने ( Will Jacks ) काल वादळी शतक झळकावले. इंग्लंडच्या युवा फलंदाजाला मागच्या वर्षी दुखापतीमुळे आयपीएलमध्ये पदार्पण करता आले नव्हते, परंतु त्याच्या फॉर्मने RCB ला जेतेपदाचे स्वप्न दाखवले आहे आणि ते पूर्ण होईल असा विश्वास चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.  

प्रेटोरिया कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या विल जॅक्सने डर्बन सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ८ चौकार व ९ षटकारांसह ४२ चेंडूंत १०१ धावा कुटल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट हा २४०.४८ इतका होता. फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे.   जॅक्सला कॉलिन इंग्राम ( ४३) व फिल सॉल्ट ( २३) यांची साथ मिळाली आणि कॅपिटल्सने ९ बाद २०४ धावा फलकावर उभ्या केल्या. प्रत्युत्तरात सुपर जायंट्सने ७ बाद १८७ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून मॅथ्यू ब्रित्झके ( ३३), जे स्मुट्स ( २७), क्विंटन डी कॉक ( २५ ) व केशव महाराज ( २५) यांनी चांगला खेळ केला. विल जॅक्सने नंतर गोलंदाजीत कमाल करताना १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेन पार्नेल व हार्डस विलजोएन यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरटी-20 क्रिकेट