इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्ले ऑफ शर्यतीत बाद होणारा चेन्नई सुपर किंग्स ( CSK) हा दुसरा संघ ठरला. २०२० आणि २०२२ अशा दोन पर्वात चेन्नईला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता आलेला नाही. आयपीएल २०२२तून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सने गुरुवारी त्यांच्यावर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात MI च्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना CSK ला ९७ धावांवर गुंडाळले.
ऋतुराज गायकवाड ( ७), डेवॉन ( ०) , रॉबिन उथप्पा ( १) व मोईन अली ( ०), अंबाती रायुडू ( १०), शिवम दुबे ( १०) व ड्वेन ब्राव्हो ( १२) यांना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जाळ्यात अडकवले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni)ने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवर गडगडला. डॅनिएल सॅम्सने १६ धावांत ३, रिले मेरेडिथने २७ धावांत २ व कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व रमणदीप सिंग यांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली.
चेन्नई सुपर किंग्सची ही अवस्था पाहून भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh ) याने CSK चा माजी उप कर्णधार सुरेश रैना ( Suresh Raina) याला ट्रोल केले. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात युवी म्हणतोय.. आपली टीम तर आज ९७ धावांतच तंबूत परतली आता... त्यावर Mr. IPL रैना म्हणाला, मी त्या सामन्यात खेळत नव्हतो.