Join us  

"रिंकू सिंगची बॅटिंग पाहताना मला कोणाचीतरी आठवण येते.."; सूर्यकुमारचं सूचक विधान

पहिले दोन सामने जिंकून भारताची मालिकेत २-०ची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:22 AM

Open in App

Suryakumar Yadav on Rinku Singh, IND vs AUS 2nd T20: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आणि रवी बिश्नोईच्या फिरकीच्या बळावर भारताने दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव केला. भारताकडून सुरूवातीला तिघांच्या अर्धशतकी खेळीनंतर रिंकू सिंगने नऊ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा केल्या. त्यामुळे सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने रिंकूचे भरभरून कौतुक केले.

काय म्हणाले सूर्यकुमार यादव?

रिंकू सिंग टीम इंडियाचा नवा फिनिशर म्हणून उदयास आला. गेल्या सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. दुसऱ्या सामन्याच्या १९व्या षटकात २५ धावा झाल्या. सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, "रिंकू सिंग खरोखरच खूप शांत आहे. गेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना तो जेव्हा खेळायला आला तेव्हा भारताला 20 चेंडूत 42 धावांची गरज होती. तो कोणत्याही दबावाशिवाय खेळला. आजच्या सामन्यातही त्याला दोन षटके मिळाली होती आणि आमची धावसंख्या २२०-२२५ पर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण रिंकूच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २३५ पर्यंत नेले."

नाव न घेता 'कॅप्टन कूल'शी तुलना

सूर्यकुमार यादवने रिंकू सिंगची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी केली. जरी त्याने धोनीचे नाव घेतले नाही तरी त्याच्या म्हणण्याचा रोख तसाच होता. सूर्या म्हणाला- रिंकू सिंग ज्या प्रकारे गेम संपवतो, तो मला कोणाचीतरी आठवण करून देतो. यानंतर मुरली कार्तिकने विचारले- तो कोण आहे? यावर उत्तर देताना सूर्य म्हणाला- त्या व्यक्तीबद्दल सर्वांना माहिती आहे. इतकी वर्षे त्याने भारतासाठी हेच काम केले आहे.

दरम्यान, भारताने प्रथम खेळताना 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस (25 चेंडूत 45 धावा) आणि टीम डेव्हिड (22 चेंडूत 37 धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी 38 चेंडूत 81 धावा जोडून भारताच्या अडचणीत वाढ केली, पण दोघेही सलग बाद झाल्याने सामन्यातील रंगत संपुष्टात आली. कर्णधार मॅथ्यू वेडने नाबाद 42 धावा केल्या मात्र संघासाठी ते पुरेसे ठरले नाही. त्यामुळे भारताने दुसरा सामना जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवरिंकू सिंगआॅस्ट्रेलिया