मुंबई : लखनऊ संघाविरुद्ध गुरुवारी २१० धावांचा बचाव करताना ब्रेबॉर्नवर पडलेले दवबिंदू पाहून सीएसकेचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग चांगलेच भडकले. त्यांनी या दवबिंदूंची तुुलना नायगारा फॉलच्या धबधब्यातून वाहणाऱ्या पाण्याशी केली. १९ वे षटक फिरकीपटूऐवजी शिवम दुबे याला देण्याच्या निर्णयाचे मात्र त्यांनी समर्थन केले.
लखनौला १२ चेंडूंत ३४, तर अखेरच्या षटकात नऊ धावांची गरज होती. आयुष बदोनी आणि एविन लुईस यांनी तुफानी फटकेबाजी करीत सामना खेचून नेला. दुबेने सहा चेंडूंत चक्क २५ धावा मोजल्या. सामन्यानंतर फ्लेमिंग म्हणाले, ‘मैदानावर दव पडत होते. फिरकीपटू चेंडूवर ग्रिप मिळवू शकत नव्हते. लखनऊने याच संधीचा लाभ घेतला. मैदानावर जडेजाने फिरकीपटूऐवजी दुबेकडे चेंडू सोपविण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. मोठ्या प्रमाणावर दवबिंदू पडत असताना तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांनी अप्रतिम मारा केला. आम्ही या सामन्यात युवा खेळाडूंना संधी दिली. मात्र, आउटफिल्ड फारच ओलसर असल्यामुळे चेंडू वारंवार ओला होत होता. प्रामाणिकपणे सांगायचे तर ब्रेबॉर्नवर गोलंदाजी करणे फारच कठीण झाले होते.’