ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये ( Women's Big Bash League) भारतीय खेळाडू कमाल करताना दिसत आहेत. सिडनी थंडर्स व मेलबर्न रेनेगॅड्स ( Sydney Thunder vs Melbourne Renegades ) या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) व स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) यांचा बोलबाला राहिला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मेलबर्न संघानं ४ धावांनी बाजी मारली. पण, चर्चा मात्र स्मृतीच्या शतकाची राहिली. १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीनं एकहाती खिंड लढवली, परंतु अखेरच्या षटकात सिडनीला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. मेलबर्न संघानं प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७५ धावा केल्या. जेमिमा रॉड्रीग्स ४ धावांवर माघारी परतली असली तरी एव्ह जोन्स व हरमनप्रीत यांनी मेलबर्नला मोठी मजल मारून दिली. जोन्सनं ३३ चेंडूंत ४२ धावा केल्या. हरमनप्रीतनं ५५ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८१ धावांची खेळी केली. जेस डफीननं २२ चेंडूंत ३३ धावा चोपल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनीचे दोन खेळाडू ४६ धावांवर माघारी परतले होते. पण, स्मृतीनं अखेरपर्यंत खिंड लढवली. तिनं ६४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ११४ धावा केल्या. स्मृतीचे हे WBBLमधील पहिलेच शतक ठरले. अखेरच्या षटकात सिडनीला विजयासाठी १३ धावांची गरज असताना हरमनप्रीतनं गोलंदाजी केली. ताहिला विलसननं पहिल्या चेंडूवर एक धाव घेत स्मृतीला स्ट्राईक दिले. पण, तिलाही दुसऱ्या चेंडूवर एकच धाव करता आली, पुढील चेंडूवर विलसननं एक धाव घेतली. पुढील दोन चेंडूंत स्मृतीनं प्रत्येकी २-२ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर षटकार हवा असताना स्मृतीला एकच धाव करता आली आणि मेलबर्ननं ४ धावांनी सामना जिंकला. हरमनप्रीतनं ८१ धावांसह १ विकेटही घेतली.
एलिसे पेरी हिच्यानंतर ऑस्ट्रेलियात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारी स्मृती ही दुसरी महिला खेळाडू ठरली. स्मृतीनं २०१६मध्ये वन डेत १०२ आणि २०२१मध्ये कसोटीत १२७ धावा केल्या होत्या. मिताली राज हिच्यानंतर ट्वेंटी-२०त एकाहून अधिक शतक करणारी स्मृती ही दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली.