Join us  

कॅरेबियन महिला खेळाडूचं अजब-गजब सेलिब्रेशन; व्हिडिओ होतोय व्हायरल

या कामगिरीशिवाय कॅरेबियन छोरीनं मैदानात केलेले सेलिब्रेशनही लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:30 PM

Open in App

वेस्ट इंडिजमध्ये रंगलेल्या महिला कॅरेबियन लीग स्पर्धेत बारबाडोस रॉयल्स संघाने बाजी मारली. फायनलमध्ये या संघानं शाहरुखच्या सह मालकीच्या ट्रिनबागो नाईट रायडर्सला पराभूत केले. या सामन्यात एलियाह एलेने हिने सर्वाधिक ४ विकेट घेत संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कामगिरीशिवाय कॅरेबियन छोरीनं मैदानात केलेले सेलिब्रेशनही लक्षवेधी ठरले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

कॅरेबियन महिला लीगमध्ये रॉयल्सनं जिंकली ट्रॉफी

महिला कॅरेबियन लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात बारबाडोस रॉयल्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्स यांच्यात जेतेपदासाठी लढत रंगली होती.  या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या नाईट रायडर्सच्या संघाला बारबाडोस रॉयल्सनं निर्धारित २० षटकात ९३ धावांवर रोखले होते. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल्स संघाने ४ विकेट राखून विजय नोंदवला.

कॅरेबियन छोरी एलियाह एलेनचा जलवा

रॉयल्सच्या संघाकडून एलियाह एलेन हिने २१  धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह ती प्लेयर ऑफ मॅचही ठरली. या मॅचमध्ये  जेनेलिया ग्लास्गोची विकेट घेतल्यावर एलियाह हिने खास अंदाजात सेलिब्रेशन केले. हटके अंदाजातील सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. महिला कॅरेबियन लीगमध्ये अनोख्या अंदाजातील सेलिब्रेशनची एक खास मालिका पाहायला मिळाली. त्यात हे सेलिब्रेशन हटके ठरले. एलियाह हिने संघातील अन्य खेळाडूंसह जमिनीवर झोपून त्यानंतर हटके अंदाजात ठेका धरल्याचा सीन दिसून आला.  योगा करावा तसे सेलिब्रेशन केले.  

भारताची शिखा पांडे लढली, पण संघ कमी पडला

ग्लास्गोशिवाय या सामन्यात एलियाह हिने  शिखा पांडे, चेडीन आणि जेम्स या तिघींच्या विकेट्स घेतल्या. भारतीय खेळाडू शिखा पांडेनं या सामन्यात ३१ चेंडूत २८ धावांची खेळी केली. जी ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून सर्वोत्तम खेळी ठरली. एलियाहशिवाय कॅप्टन हेली मॅथ्यूजनं दोन विकेट्स घेतल्या. नाईट रायडर्स संघाने सेट केलेले ९४ धावांचे टार्गेट बारबाडोस रॉयल्स संघाने १५ षटकात पूर्ण केले. चमारी अट्टापट्टू हिने रॉयल्सकडून ४७ चेंडूत ३९ धावांची नाबाद खेळी केली.  

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमहिला टी-२० क्रिकेट