ODI World Cup 2023 । नवी दिल्ली : 2023 मध्ये भारतात वन डे विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. भारतीय संघाने शेवटच्या वेळी 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आणि तेव्हापासून भारतीय संघाने अनेक ICC स्पर्धांच्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे परंतु विजेतेपद मिळवण्यात संघाला यश आले नाही. त्यामुळे यंदा घरच्या मैदानावर होणाऱ्या वन डे विश्वचषकावर टीम इंडियाची नजर असणार आहे. आयसीसी ट्रॉफीचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य भारतासमोर आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंच्या संख्येबाबत एक मोठे विधान केले आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वन डे मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विश्वचषकाच्या तयारीबद्दल त्यांनी म्हटले, "माझ्या मते, आम्ही आमच्या संघाबाबत स्पष्ट आहोत, आम्हाला कोणते खेळाडू हवे आहेत याची आम्हाला कल्पना आहे. विश्वचषकासाठी आम्ही 17-18 खेळाडूंपुरते मर्यादित आहोत. आमच्याकडे असे काही खेळाडू आहेत जे अजूनही दुखापतीशी झुंजत आहेत आणि ते येताच त्यांना संघात समाविष्ट करू. त्यांना दुखापतीतून सावरण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहणे देखील महत्त्वाचे असेल."
राहुल द्रविड यांनी सांगितला भारताचा प्लॅन तसेच आम्ही चांगल्या मानसिकतेने पुढे जात आहोत आणि आम्हाला कोणता संघ मैदानात उतरवायचा आहे याबद्दल आम्ही नियोजन केले आहे. आम्ही आशा करतो की संघातील सर्व खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळतील. 15-16 खेळाडूंची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी घेत आहोत. कारण भारतात होणारा विश्वचषक वेगवेगळ्या परिस्थितीत खेळवला जाणार आहे. त्यामुळे आम्हाला एक मजबूत संघ लागेल, जिथे चार वेगवान गोलंदाजही संघात खेळू शकतील आणि तीन फिरकीपटूही संघात स्थान मिळवू शकतील. त्यामुळे परिस्थितीनुसार आम्ही सर्व खेळाडूंची चाचणी घेत आहोत, असे भारतीय प्रशिक्षक द्रविड यांनी आणखी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"