अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ २००३च्या पराभवाची परतफेड करेल अशी भारतीयांची अपेक्षा फोल ठरली. सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेली रोहित शर्मा अँड टीम जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख, रणवीर यांच्यासह बॉलिवूडचे स्टार्स अन् दीड लाख प्रेक्षकांच्यासमोर ऑस्ट्रेलियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्नांचा चुराडा केला. यावर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर टीम इंडियाला प्रोत्साहन दिले आहे.
'हेड'ने कोट्यवधी 'हृदयं' तोडली; भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाने जग जिंकलं!
पीएम मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि जिद्द लक्षात घेण्याजोगी होती. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.'
तर काँग्रेस नेते नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे. गांधी म्हणाले की, टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. जिंका किंवा हरा आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. तसेच विश्वचषकातील नेत्रदीपक विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन केले, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं.
आजचा सामना अटीतटीचा झाला. मोहम्मद शमीने दुसऱ्या षटकात डेव्हिड वॉर्नरला ( ४) माघारी पाठवले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पुढील षटकांत मिचेल मार्श ( १५) व स्टीव्ह स्मिथ ( ४) यांना बाद केले. पण, ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन ही जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि भारताच्या हातून मॅच अलगद घेऊन गेली. या दोघांच्या संयमी आणि तितक्याच जबरदस्त खेळीने भारतीय संघाचे मनोबल खचताना दिसले. पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकण्याची संधी सहजासहजी हातातून जावू देत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर हेड व लाबुशेन यांनी ३ बाद ४७ धावांवरून संघाला सावरले अन् विजय निश्चित केला.
ही जोडी तोडण्यासाठी शमी आणि बुमराह या प्रमुख गोलंदाजांना पुन्हा आणले गेले, परंतु त्यांच्यावरही हेडने आक्रमण चढवले. हेडच्या शतकाने स्टेडियमवर उपस्थित दीड लाख चागल्यांची बोलती बंद केली होती.