Join us  

Ind vs Pak: 'शमी पुढच्या सामन्यात जलवा दाखव...आम्ही तुझ्यासोबत!'; सेहवाग, पठाण यांचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर

मोहम्मद शमीला ट्रोलर्सकडून लक्ष्य केलं जात असून त्याच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली जात आहे. ट्रोलर्सच्या या भाषेवर भारतीय संघाचा माजी खेळाडूंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:30 PM

Open in App

नवी दिल्ली-

भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच पाकिस्तान विरोधात पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्ताननं दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताचा १० विकेट्सनं पराभव केला. सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सपशेल फोल ठरली. भारताचे शिलेदार एकामागोमाग एक विकेट टाकत गेले, तर दुसरीकडे गोलंदाजीत एकाही गोलंदाजाला विकेट प्राप्त करता आली नाही. 

भारतीय संघाच्या मानहानीकारक पराभवावर सोशल मीडियात टीम इंडियाविरोधात ट्रोलर्स चांगलेच सक्रीय झाले आहेत. भारतीय गोलंदाजांना लक्ष्य केलं जात आहे. पण यात मुख्यत्वे मोहम्मद शमीला ट्रोलर्सकडून लक्ष्य केलं जात असून त्याच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली जात आहे. ट्रोलर्सच्या या भाषेवर भारतीय संघाचा माजी खेळाडूंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी मोहम्मद शमीला पाठिंबा दिला आहे. 

समालोचक हर्षा भोगले यांनीही शमीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. "जे लोक शमीबाबत वाईट बोलत आहेत. त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही क्रिकेट पाहणं सोडून द्या. तुमची कमतरता कधीच जाणवणार नाही", असं रोखठोक विधान हर्षा भोगले यांनी केलं आहे. 

भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण, सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनीही ट्रोलर्सला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. "मीही त्याच भारत-पाकिस्तान सामन्याचा एक भाग आहे की जिथं भारताला पराभवला सामोरं जावं लागलं होतं. हे मी काही वर्षांपूर्वीचं वातावरण सांगू इच्छितो. त्यावेळी मला कुणीच असं पाकिस्तानात निघून जा वगैरे बोललं नव्हतं. सध्या जो मुर्खपणा सुरू आहे तो लगेच थांबवायला हवा", असं इरफान पठाण म्हणाला. 

विकेट कुणालाच मिळाली नाही, मग शमीच जबाबदार का?"मोहम्मद शमीवरील ऑनलाइन हल्ला अतिशय आश्चर्यकारक आहे. मी त्याच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे आणि जो कुणी भारतीय संघाची कॅप परिधान करतो त्याच्या मनात देशाप्रती सर्वोच्च भावना असते. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. पुढच्या सामन्यात तुझा जलवा दाखवून दे", असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे. तर मोहम्मद शमी आम्हाला तुझा अभिमान आहे, असं ट्विट युजवेंद्र चहल यानं केलं आहे. 

पाक कर्णधार बाबर आझम यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दुबईच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर करुन घेत गोलंदाजीला मिळणाऱ्या स्विंगचा पाक संघानं योग्य वापर करुन घेतला. शाहीन शाह आफ्रिदी यानं पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि तिसऱ्या षटकात केएल राहुलला माघारी धाडलं. कोहली आणि पंतच्या संयमी खेळीमुळे भारताला २० षटकांच्या अखेरीस १५१ धावा करता आल्या होत्या. 

अर्थात भारतीय संघाच्या गोलंदाजांना एकही विकेट सामन्यात मिळवता आली नाही. मग संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडे याचा जाब विचारायला हवा. फक्त मोहम्मद शमी यालाच लक्ष्य का केलं जात आहे असाही सवाल उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानविरेंद्र सेहवागइरफान पठाण
Open in App