ICC ODI World Cup 2023 - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणारा वन डे वर्ल्ड कप गाजवण्यासाठी सज्ज होत आहे. २०११ नंतर झालेल्या दोन वन डे वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भारताला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती, परंतु यंदा हा दुष्काळ घरच्या मैदानावर संपवण्याचा निर्धार हिटमॅनने केला आहे. ''ही ट्रॉफी मी इतक्या जवळून कधी पाहिली नव्हती.. जरी आम्ही २०११ चा वर्ल्ड कप जिंकला आहे, परंतु मी त्या संघाचा भाग नव्हतो. पण, खरंच ही ट्रॉफी खूप सुंदर दिसते आणि तिच्यामागे अनेक संस्मरणीय आठवणी, इतिहास आहे,''असे रोहित म्हणाला.
५ ऑक्टोबरला इंग्लंड व न्यूझीलंड यांच्या लढतीने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सध्या अमेरिकेत असलेला रोहित म्हणाला, ही ट्रॉफी खरंच खूप सुंदर आहे आणि आशा करतो की ती आम्ही उचलण्यात यशस्वी होवू. फिंगर क्रॉस...
“मला एक वस्तुस्थिती माहित आहे की आम्ही ज्या प्रत्येक मैदानावर, प्रत्येक ठिकाणी प्रवास करणार आहोत, त्याला मोठा पाठिंबा मिळतोय. तुम्हाला माहिती आहे, हा वर्ल्ड कप आहे, म्हणून प्रत्येकजण याची आणि वर्ल्ड कप १२ वर्षांनंतर भारतात परत येण्याची वाट पाहत आहे. २०११मध्ये भारतात शेवटचा वन डे वर्ल्ड कप खेळला गेला होता. आम्ही २०१६ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल़्ड कप भारतात खेळलो, परंतु देशात १२ वर्षांनंतर वन डे वर्ल्ड कप होत असल्याने लोक खूप उत्साही आहेत. मी सर्व ठिकाणी खेळण्यासाठी उत्सुक आहे,''असे रोहितने सांगितले.
२०११चा वर्ल्ड कप प्रत्येकासाठी संस्मरणीय आहे आणि मला आठवयंत की प्रत्येक सामना, प्रत्येक चेंडू घरात बसून पाहिला होता, असेही रोहितने सांगितले. तो म्हणाला, “ त्यावेळी दोन प्रकारच्या भावना होत्या, एक म्हणजे मी त्या संघाचा भाग नव्हतो, त्यामुळे थोडा निराश झालो होतो. मी ठरवले की वर्ल्ड कप पाहणार नाही, पण पुन्हा दुसरी भावना म्हणजे भारत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत खूप चांगला खेळत होता,” रोहितने २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ५ शतकं झळकावून उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण, भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हार मानावी लागली.
“ २०१५ आणि २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचा मी एक भाग होतो. वर्ल्ड कप खेळायला खूप छान वाटले. आम्ही उपांत्य फेरीत गेलो, फायनलमध्ये जाण्यासाठी आणि फायनलमध्ये चांगले खेळण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले, परंतु पुन्हा एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, आम्ही अंतिम फेरीत जाऊ शकलो नाही. आम्ही पुन्हा घरी परतलो आहोत, म्हणून आशा आहे की यावेळी आम्ही गोष्टी बदलू शकू आणि अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही एक किंवा दोन दिवसात वर्ल्ड कप जिंकू शकत नाही. तुम्हाला संपूर्ण महिना, दीड महिना चांगला खेळ करावा लागेल आणि सातत्य राखावे लागेल,” असेही रोहितने मान्य केले.