लाहोर - भारताबरोबर क्रिकेट मालिका खेळण्यासाठी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे सतत रडगाणे सुरु असते. पण सद्य परिस्थितीत राजकीय दबाव लक्षात घेता दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका होईल असे वाटत नाही असे स्पष्ट मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने व्यक्त केले. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका सुरु व्हावी यासाठी बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये करार झाला पाहिजे. पण यामध्ये आयसीसी आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावत नसल्याबद्दल अक्रमने आयसीसीवरही टीका केली.
भारत आणि पाकिस्तानमधल्या जनतेचा परस्परांशी संपर्क महत्वाचा आहे. खेळ आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळया आहेत असे अक्रम जिओ टीव्हीशी बोलताना म्हणाला. लवकरच इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिका सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्रम म्हणाला कि, भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग मिळू शकतो. या दोन देशांमधला क्रिकेट सामना पाहणे हा एक आनंद देणारा अनुभव असतो. अॅशेसपेक्षा भारत-पाकिस्तान सामना पहायला जास्त आवडतो. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधली अॅशेस मालिका दोन कोटी लोक पाहतात तर भारत-पाकिस्तान सामन्यावर अब्जावधी लोकांचे लक्ष असते असे अक्रमने सांगितले.
भारत पाकिस्तानबरोबर खेळायला तयार नसेल तर आपण त्यांच्यावर जबरदस्ती करु शकत नाही असे अक्रम म्हणाला. बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये 2013 ते 2015 दरम्यान सहा मालिका खेळण्याचा सामंजस्य करार झाला होता. पण सीमेवरील तणावामुळे एकही मालिका होऊ शकली नाही. भारताला पाकिस्तानबरोबर खेळायचे नसेल तर आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करु शकत नाही असे आयसीसीचे प्रमुख डेव्ह रिचर्डसन आधीच म्हणाले होते.
दोन देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये झालेल्या करारानुसाच द्विपक्षीय क्रिकेट मालिका होते. आम्हाला भारत-पाकिस्तानमधले सामने पाहायला आवडतील पण तुमचे राजकीय संबंध कसे आहेत त्यावर क्रिकेट सुद्धा अवलंबून आहे असे रिचडर्सन यांनी म्हटले होते.