नवी दिल्ली, दि. 14 -महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघातील स्थानाबाबत अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केले जात आहेत.संघाचे मुख्य निवडकर्ता एम.एस.के.प्रसाद यांनीही धोनीच्या संघातील समावेशाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री प्रसाद यांच्या मताशी सहमत नाहीत. धोनीचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला संघातून बाहेर करण्याचा विचारही संघ व्यवस्थापन करू शकत नाही असं शास्त्री म्हणाले आहेत.
श्रीलंका दौ-यात धोनीने शानदार प्रदर्शन करताना 82.23 च्या स्ट्राईक रेटने 162 धावा केल्या होत्या. या संपूर्ण मालिकेत धोनीला बाद करण्यात लंकेच्या गोलंदाजाना अपयश आलं होतं. या दौ-यात 100 स्टंपिंग करणाराही धोनी पहिला विकेटकिपर बनला. धोनीकडे फिटनेस आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी आहेत, 2019 च्या विश्वचषकासाठी त्याची गरज आहे असं इंडिया टीव्हीसोबत बोलताना शास्त्री म्हणाले.यावेळी बोलताना त्यांनी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि ऑलराउंडर कपिल देव यांच्यासोबत धोनीची तुलना करताना त्याने मिळवलेल्या यशाचा सन्मान करायला हवा असं म्हटलं.
धोनीसारखा महान खेळाडू तुम्हाला कुठे मिळेल? धोनी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्या पंक्तीत येतो. त्याने आणि त्याच्या कॅप्टनशिपमध्ये संघाने मिळवलेल्या यशाचा सन्मान करायला हवा. धोनीमध्ये अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे,. एखाद्या खेळाडूचं मुल्यांकन हे त्याच्या सध्याचा फॉर्म आणि फिटनेसच्या आधारे केलं जातं आणि धोनीकडे या दोन्ही गोष्टी आहेत. तो जगातला सर्वश्रेष्ठ विकेटकिपर आहे, असं शास्त्री म्हणाले.