बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला घरच्या मैदानावर केकेआरकडून २१ धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबीचे फलंदाज अपयशी ठरले. केवळ विराट कोहलीलाच अर्धशतक करता आले. या पराभवानंतर कोहलीने पराभवाचे कारण सांगताना आमचा संघ हरण्याच्याच लायकीचा होता, असे मोठे वक्तव्य केले.
कोहली म्हणाला, ‘खरे सांगायचे तर आम्ही सामना त्याच्यांकडे सोपवला होता. मैदानावर व्यावसायिकता दाखवली नाही म्हणून आम्ही हरण्यास पात्र होतो. साहजिकच आम्ही दर्जेदार खेळ करीत नव्हतो आणि हे मान्य करण्यात अजिबात संकोच नसावा. आम्हाला संधीचा फायदा घेतला नाही. काही संधी गमावल्या, त्यामुळे २५-३० अधिक धावा मोजाव्या लागल्या. क्षेत्ररक्षणातही काही संधी गमावल्या, याची किंमत सामना गमावून चुकवावी लागली. आम्ही अशा चेंडूंवर विकेट गमावल्या, ज्यावर क्षेत्ररक्षकांनी सहज बाद केले. विकेट गमावल्यानंतरही आम्ही खेळात टिकून राहण्यापासून एक भागीदारी दूर होतो.’
मला वाटते, आम्ही एक सामना जिंकतो आणि दुसरा हरतो. पुढे काळजी घ्यावी लागेल. दुसऱ्या टप्प्यात उत्तम स्थितीत राहण्यासाठी काही सामने जिंकण्याची गरज आहे,’ असे मत कोहलीने मांडले.